(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाणी टंचाईवर मात करुया! जिल्ह्यात सोमवारपासून 'जलसमृद्ध नाशिक' अभियान, नेमकी काय आहे संकल्पना?
Jalsamruddha Nashik : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आता नाशिक जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सोमवारपासून (दि. 15) जलसमृद्ध नाशिक हे अभियान राबविण्यात येणार आहे.
Nashik News नाशिक : पाणी टंचाईवर (Water Scarcity) मात करण्यासाठी आता नाशिक जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. टंचाईसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्ध नाशिक अभियानास (Jalsamruddha Nashik Abhiyan) 15 एप्रिलपासून प्रारंभ होत होणार आहे, अशी माहिती नाशिकची जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी दिली आहे.
भोसला मिलिटरी कॅम्पसच्या मुंजे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये यासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांच्यासह संबंधित अधिकारी व सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक, बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वर्षानुवर्षे साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जाणार
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, लोकसहभाग व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करावयाचा आहे. येत्या 15 एप्रिल ते 15 जून 2024 या कालावधीत या अभियानाची गंगापूर धरणापासून (Gangapur Dam) सुरुवात करण्यात येणार असून जिल्ह्यातील इतर धरणे, नदी व जलाशयात ते राबविले जाणार आहे. या अभियानात धरणांमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जाणार असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ (Sludge) त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठवण क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होवून उत्पादनक्षमता वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले.
सोमवारी गंगापूर धरणाजवळ अभियानाचा शुभारंभ
गत वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक या अभियानातून गावागावात लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्याची ही उत्तम संधी आहे. यासाठी जैन संघटना यांच्यासह इतर सेवाभावी, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, बांधकाम संघटनांचेही सहकार्य लाभणार आहे. सोमवार 15 एप्रिल रोजी गंगापूर धरणाजवळील गंगावरे गाव येथे सकाळी 8.00 वाजता या अभियानाचा शुभारंभ होणार असून जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केले.
बंगळुरूसारखी पाणी समस्या नाशिकमध्ये भेडसावू नये म्हणून हे अभियान
पाणीप्रश्न हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असून येणारे दोन महिने आपल्या सर्वांसाठी संधीचे सोन्यात रूपांतर करण्याचे आहे. भविष्यात बंगळुरू शहरासारखी पाणी समस्या नाशिकमध्ये भेडसावू नये यासाठी आपण सर्वांच्या सहभागातून हे अभियान नक्कीच यशस्वी करू, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी यावेळी व्यक्त केला.
आणखी वाचा