Weather Update : उत्तर महाराष्ट्रात विजांसह अवकाळी पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
Weather Update : पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारी उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Weather Update नाशिक : ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी ओसरल्याचे दिसून येते. तसेच पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारी उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) विजांसह पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
धुळे (Dhule) येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे येथे विजांसह अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मनमाडला अवकाळी पावसाची हजेरी
नाशिकच्या मनमाडला (Manmad) शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री बाराच्या सुमारास तब्बल पाऊण तास मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींनी मनमाडला हजेरी लावली. ग्रामीण भागातदेखील पाऊस पडला. महिन्याभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांना (Crops) शनिवारी एकदा पावसाने झोडपले. यामुळे मका, हरभरा, गहू या पिकांसह पालेभाज्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) गेल्या दोन महिन्यांपासून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर दिंडोरी (Dindori) आणि बागलाण तालुक्यातही सरी कोसळल्या.
कळवणलाही झोडपलं
कळवण (kalwan) तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अभोणा, नांदुरी, दरेगावल मोहनदरी, कातळगाव, कुंडाणे, गोबापूर, मार्कंड पिंप्री, पाळे पिंप्री या गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं
तब्बल एक तासाहून अधिक वेळ पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या कांदा काढणीला आहे. तर हरभरा, गहू ही पिके बहरात असतानाच अवकाळीने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या गारपिटीतून शेतकरी सावरत नाही तोच आता अवकाळीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
काही ठिकाणी तापमानात घट
राजस्थानच्या काही भागात तीव्र ते अत्यंत तीव्र थंडी जाणवण्याची शक्यता आहे. हरियाणा आणि चंदीगडच्या वेगळ्या भागांमध्ये दाट धुक्यासह गारठा पाहायला मिळेल. 9 जानेवारीपर्यंत देशात काही ठिकाणी तापमानात घट होणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या