Harihar Fort Accident : हरिहर किल्ला उतरताना अचानक तोल गेला अन् खोल दरीत कोसळला; भंडाऱ्याच्या युवकाचा दुर्दैवी अंत
Harihar Fort Accident : गडकिल्ले बघण्याकरिता गेलेल्या भंडाऱ्यातील खमारी बुट्टी या गावातील एका तरुणाचा नाशिक येथील हरिहर किल्ला उतरताना दरीत कोसळून मृत्यू झाला.

Harihar Fort Accident : नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरुणाचा घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (31 ऑगस्ट) दुपारी घडली. या घटनेमुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अशिष टिकाराम समरीत (28, रा. भंडारा) असे मृत युवकाचे नाव आहे. तो आपल्या मित्रमंडळींसह ट्रेकर ग्रुपमध्ये सहभागी होऊन नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकसाठी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अशिष समरीत आणि त्याचा ट्रेकर ग्रुप शनिवारी सकाळी हरिहर किल्ल्यावर गेला होता. काही वेळ किल्ल्यावर थांबून ते परतीच्या मार्गाला लागले. दुपारी साधारणतः बाराच्या सुमारास या ग्रुपने किल्ला उतरण्यास सुरुवात केली. परतीच्या मार्गावर समरीत याचा पाय निसटला आणि तो किल्ल्यावरून खाली पडला. उंचावरून दगडावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
या घटनेनंतर हरिहर किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अनुभव नसलेल्या ट्रेकर्सनी, विशेषतः पावसाळ्यात, सुसज्ज मार्गदर्शकांशिवाय ट्रेकिंग टाळावे, तसेच योग्य शूज आणि सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, हरिहर किल्ल्यावर (हरिहरगड / हर्षगड) गिरीभ्रमण करताना सुरक्षिततेचे नियम न पाळल्यास ते अत्यंत धोकादायक ठरू शकते. यापूर्वीही या किल्ल्यावर हौशी पर्यटकांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा ट्रेकिंग पॉईंट जितका साहसपूर्ण, तितकाच जोखमीचा देखील आहे.
नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसलेला हरिहरगड किल्ला दुर्गप्रेमींसाठी एक खास आकर्षण राहिला आहे. या किल्ल्यावर चढाई करण्याचा मुख्य कारण म्हणजे त्याच्या खास रचनेतील, काळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. या पायऱ्यांतून वर जाण्याचा अनुभव थरारक असतो. किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून तो समुद्रसपाटीपासून सुमारे 1120 मीटर उंच आहे. त्यामुळे हा ट्रेक, ट्रेकरच्या शारीरिक क्षमतेची आणि मानसिक तयारीचीही खरी कसोटी पाहतो.चढाईसाठी वापरण्यात येणाऱ्या पायऱ्या अत्यंत अरुंद असून, त्यावरून चढताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. खरी कसोटी मात्र किल्ल्यावरून उतरताना लागते. हरिहरच काय, पण बहुतेक सर्व गड-किल्ले चढण्यापेक्षा उतरण्याच्या वेळी अधिक धोकादायक ठरतात.
याच वेळी हौशी पर्यटकांकडून निष्काळजीपणा केला जातो आणि अपघाताची शक्यता वाढते. याच कारणाने हरिहर किल्ल्यावर याआधीही अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे वन विभाग आणि दुर्गप्रेमींनी वेळोवेळी किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना देण्याचे आवाहन केले आहे. योग्य मार्गदर्शन, अनुभवसंपन्न सोबती, आवश्यक सुरक्षा साधने आणि हवामानाची पूर्वकल्पना या गोष्टींचे पालन केल्यास अशा अपघातांपासून बचाव होऊ शकतो.
आणखी वाचा























