Nashik Crime : नाशिकमधील भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या, मारहाण केलेल्या 'त्या' युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Nashik Crime : निमसे गटाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रेचा आज शुक्रवारी (दि. 29) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Nashik Crime : बैल पोळा (Bail Pola 2025) सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका (Nandur Naka) येथे माजी नगरसेवक भाजप नेते उद्धव निमसे (Uddhav Nimse) आणि धोत्रे या दोन गटात हाणामारी झाली होती. यात निमसे गटाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रेचा आज शुक्रवारी (दि. 29) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या हाणामारीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. या प्रकरणात नाशिकच्या आडगाव नाका पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
निमसे यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केलेले आहेत तर मुख्य आरोपी असलेले उद्धव निमसे आणि त्यांचे काही साथीदार हे अद्याप फरार आहेत. मात्र, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी धोत्रे कुटुंबाकडून केली जात आहे.
राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू
जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील राहुल धोत्रेचा शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
उद्धव निमसेंना तत्काळ अटक करा
उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धोत्रे कुटुंबाने केली आहे तर पोलिसांकडून योग्य ती कारवाई सुरू असून गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगत पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
ठाकरे गटाने दिला होता आंदोलनाचा इशारा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गट व पीडित कुटुंबीयांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. 22 ऑगस्ट रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण नोंद झाली असून भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनीच गुंडांना व मुलांना बरोबर घेऊन स्वतः त्या युवकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. जखमी झालेल्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असूनदेखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही, यावरून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राजकीय दबावाला बळी न पडता ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी. आमच्या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाही, तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला होता.
आणखी वाचा























