Girish Mahajan : रोहित पवारांच्या कंपनीवर ईडीची धाड, गिरीश महाजन म्हणाले, "मोदींनी देशात स्वच्छता मोहीम हाती घेतलीय"
Girish Mahajan : आमदार रोहित पवार यांच्या बारमती अॅग्रो कंपनीवर (Baramati Agro) केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली. यावर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Girish Mahajan नाशिक : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारमती अॅग्रो कंपनीवर (Baramati Agro) केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली. यावर मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) प्रतिक्रिया दिली आहे. सुड वगैरे काही नाही. मोदी यांनी देशात स्वच्छता मोहीम हाती घेतली घेतली आहे. हे धाड सत्र अचानक होत नाही. बऱ्याच दिवसांपासून तपासणी होत असते. गडबड वाटली तर रेड पडते, अशी खोचक टीका महाजन यांनी केली आहे.
यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या लोगोच्या अनावरण सोहळ्यासाठी शुक्रवारी नाशिकमध्ये गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिककरांसाठी ही एक पर्वणीच
युवा महोत्सवाबाबत गिरीश महाजन म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जन्म दिवसानिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा मान नाशिकला मिळाला आहे. देशातील ८ हजार युवक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाला येणार आहेत.ही नाशिककरांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. सभास्थळापर्यंत रोड शो होणार आहे.
महोत्सव आणि लोकसभा निवडणुकीचा संबंध नाही
हजारो, लाखो युवा, युवती यांची या कार्यक्रमात हजेरी राहील. २२ जानेवारी आणि हा कार्यक्रम हा एक योगायोग आहे. १२ जानेवारी रोजी मोदी या कार्यक्रमाला हजर राहतील, ते कार्यक्रम चुकवणार नाही. याचा आणि लोकसभेचा कुठलाही संबंध नाही. गोदा आरती आणि काळाराम मंदिर याबाबत अजून संमती मिळालेली नाही. आमचा आग्रह आहे, की मोदी यांनी काळाराम मंदिरात यावे. पण सुरक्षेचा देखील प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले.
आव्हाडांची डीएनए तपासणी करा
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर महाजन म्हणाले की, का काही लोकं असं करतात? मायनॉरिटी लोकांना इतकं कुरवाळत बसायचं. मतांच्या राजकारणासाठी हे सुरु आहे. वेडा बनून पेडा खायचा असे सध्या चालले आहे. मी तर म्हणतो आव्हाड यांची डीएनए तपासणी केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे तुम्ही सहमत आहे का, तुमचं मत काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या विरोधात बोलले तर प्रसिद्धी मिळते, अशी काही लोकांची भावना असल्याचेही त्यांनी म्हटले.
टिकणारे आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न
मराठा आरक्षणावर ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आम्ही तयार आहोत. मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून काम सुरू आहे. आम्ही एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेणार आहोत. टिकणारे आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा