Gautami Patil Program Nashik: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा, नाशिकच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण
Gautami Patil Program Nashik: नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. वार्तांकन करणाऱ्या मिडीयाच्या फोटोग्राफर्स आणि कॅमेरामनवर हुल्लडबाजांकडून हल्ला. काही जण जखमी
Dispute in Gautami Patil Program Nashik: लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात वाद आणि गोंधळाची परंपरा कायम असून मंगळवारी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमातदेखील हुल्लडबाजी करण्यात आली. दोन पत्रकारांना उपस्थित तरुणांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातदेखील गोंधळ झाला आणि खुर्च्या उलटवण्यापर्यंत प्रकार घडले होते. तरुणांना नियंत्रित न करता आल्याने हा प्रकार घडला होता. आता मंगळवारी हाच प्रकार घडला. त्यामुळे गौतमी पाटील आणि गोंधळ ही परंपरा कायम राहिली. नाशिकमध्ये झालेल्या गोंधळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.
नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मर्यादित होते. मात्र सर्वच प्रेक्षक स्टेजजवळ जमा झाल्याने एकच गर्दी झाली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था असली तरी कार्यक्रमाला आलेल्यांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पाहण्यासाठी कोणताच अडथळा नको होता. याचवेळी कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेले दोन्ही पत्रकार हे व्यासपीठाजवळ जातच तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली.
यावेळी हुल्लडबाज तरुणांनी उपस्थित पत्रकारांचे पाय ओढण्यास सुरवात केली. त्यामुळे दोन्ही पत्रकारांना व्यासपीठावरून पाय धरून खाली ओढण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली. यावेळी इतर उपस्थित तरुणांनी या दोघांना मारहाण केली. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून तसेच कॅमेऱ्याचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यावेळी बंदोबस्तास असलेले पोलिस मुळात कार्यक्रमाच्या या गोंधळाच्या ठिकाणी नव्हते. व्यासपीठावरून सूचना केल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
पाहा व्हिडीओ : Gautami Patil Controversy : नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ,मीडियाच्या कॅमेरामनवर हल्ला
गोंधळावर गौतमी पाटील म्हणाली...
दरम्यान, गौतमी पाटीलनं प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी होत असलेल्या गोंधळाबाबत बोलताना सर्वच ठिकाणी गोंधळ किवा वाद होतो, असे नाही. अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडतात, असे सांगितले. कार्यक्रमांना तरुणांबरोबरच महिलादेखील चांगला प्रतिसाद देतात. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आपल्याला प्रसिद्धी मिळाली असे सांगून त्यांनी तूर्तास लग्न करण्याचा आपला विचार नाही कारण ही आपल्या कामाची सुरुवात आहे, असे ते म्हणाले.
गौतमी पाटीलवर जिल्हा बंदी करा...
नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.