Nashik Rain : नाशिकच्या पुरामुळे आमदारांचीही ओढाताण, दशक्रिया विधीसाठी ट्रॅक्टरने धरली वाट
Saroj Ahire : देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना दशक्रिया विधीसाठी जाताना रस्त्यावर पाणी असल्याने ट्रॅक्टरवर उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
नाशिक : शहरासह ग्रामीण भागाला दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलेच झोडपले आहे. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर जिल्ह्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह (Gangapur Dam) सहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यातच आता नाशिकच्या पुराचा फटका आमदारांना देखील बसल्याचे दिसून आले आहे.
शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक भागांत मंदिरे, पुल, रस्ते आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याचे चित्र असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. अशातच आता देवळालीच्या आमदारांनाही पुराचा सामना करावा लागला आहे. आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांचा ट्रॅक्टरवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
नाशिकच्या पुराचा आमदारांनाही फटका
देवळाली मतदारसंघातील लोहशिंगवे वंजारवाडीला जोडणारा नाल्याचा पूल पाण्याखाली गेल्याने देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागला. दशक्रिया विधीसाठी जाताना रस्त्यावर पाणी असल्याने ट्रॅक्टरवर उभे राहून सरोज अहिरे यांनी नाल्यावरील पूल ओलांडला. नाशिकमधील पूरपरिस्थितीचा सामना आमदार सरोज अहिरेंनी आज केला. त्यांचा ट्रॅक्टरमधील प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लोकप्रतिनिधींचीच अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरल्याने भाविकांची मोठी गैरसोय
त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेले. यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरासह बाजारपेठ, मेनरोड, तेली गल्लीत देखील पाणी शिरले आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या