Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
Nashik Lok Sabha : पंकजा मुंडे यांनी मी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून निवडणुकीसाठी उभं करेल, असे वक्तव्य केले होते. यावरून छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत (Mahayuti) अजूनही उमेदवार ठरलेला नाही. त्यातच काल बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिकच्या जागेवर प्रीतम मुंडेंना उभे करेल, असे म्हटले. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले होते की, मला बीडमधून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे प्रीतम मुंडेंचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून (Nashik) उभी करेन, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे.
पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावे
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत, असे नाही. नाशिकमध्ये तिन्ही पक्षात खूप उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.
छगन भुजबळांची नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार
दरम्यान, छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून जाहीर माघार घेतली होती. छगन भुजबळ यांनी म्हटले होते की, नाशिकच्या बाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार (Ajit Pawar) यांचा निरोप आला होता. तिथे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे होते. आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि त्या ठिकाणी अमित शाह यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. तिथे जागा वाटपाबाबत चर्चा झाली. छगन भुजबळ यांना उभे करा, असे थेट अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना म्हणाले की, तिथे हेमंत गोडसे (Hemant Godse) आमचे उमेदवार आहेत. परंतु अमित शाह म्हणाले की, आम्ही त्यांना समजावू. मात्र, अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे मी या निवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा केली होती.
नाशिक लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा कायम
छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने या जागेवरील दावा अद्याप सोडलेला नाही. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी देखील नाशिकच्या जागेसाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, असे म्हटले आहे. यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी, शिवसेना की भाजपला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा