![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तुम्ही नाराज आहात का, राज्यसभेसाठी इच्छुक आहात का? जितेंद्र आव्हाडांची बाजू घेणारे छगन भुजबळ म्हणाले....
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. नाराजीच्या चर्चांवर आता छगन भुजबळांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
![तुम्ही नाराज आहात का, राज्यसभेसाठी इच्छुक आहात का? जितेंद्र आव्हाडांची बाजू घेणारे छगन भुजबळ म्हणाले.... Chhagan Bhujbal s reaction on he is unhappy in mahayuti for supporting Jitendra Awhad Maharashtra Politics Marathi News तुम्ही नाराज आहात का, राज्यसभेसाठी इच्छुक आहात का? जितेंद्र आव्हाडांची बाजू घेणारे छगन भुजबळ म्हणाले....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/31/be92a40e4d296ff0a543274173385e251717139711066923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhagan Bhujbal : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाड (Mahad) येथील चवदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडण्यात आला. यावरून महायुती (Mahayuti) जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आव्हाडांची बाजू घेत पाठराखण केली. यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली. आता भुजबळांनी नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्ताने छगन भुजबळांनी त्यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी भुजबळ अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन केले. यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली. तसेच आपण नाराज नाही, असे म्हणत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
नाराजीच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया
तुम्ही नाराज आहात का, राज्यसभेसाठी इच्छुक आहात का? अशी विचारणा केली असता छगन भुजबळ म्हणाले की, मी नाराज नाही. मी शाहू, फुले, आंबेडकर समता परिषदेचा पाईक आहे. मी अशा प्रश्नांवर स्पष्टपणे बोलतो, खोटं बोलणे मला जमत नाही. विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. मी लोकसभा सोडली, राज्यसभेचे देखील सोडा. आज अहिल्यादेवींना अभिवादन करणे पहिले काम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
मनुस्मृतीबाबत काय म्हणाले भुजबळ?
मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाही. शिक्षणाचा अधिकार नाही. मनुस्मृतीला बाजूला ठेवून अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांना आठवले पाहिजे. मनुस्मृतीत महिलांना कोणताही अधिकार नाही. अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांनी जे काम केलं ते मनुस्मृतीला बाजूला ठेवून केले, असे त्यांनी म्हटले.
भुजबळांचे दरेकरांना उत्तर
छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याने भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भुजबळांवर टीका केली होती. यावर छगन भुजबळांनी प्रवीण दरेकरांना उत्तर दिले आहे. भुजबळ म्हणाले की, दरेकर काय म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. जितेंद्र आव्हाड हे विरोधक आहे. त्यांचा विरोध निश्चितच करा. आमचं काही म्हणणं नाही. मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात नको हे सांगा. मनुस्मृती जाळा, जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. फक्त विरोधासाठी विरोध करू नका. आमची भूमिका फुले, शाहू, आंबेडकरांची आहे. मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणार आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)