Chhagan Bhujbal : नाशिक-मुंबई महामार्गाच्या अवस्थेवरून छगन भुजबळ कडाडले; म्हणाले, खड्डे असताना टोल का द्यायचा?
Nashik - Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावर खड्डेच खड्डे असताना टोल का द्यायचा? असा सवाल राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai Highway) 25 किमी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्ते दुरुस्तीबाबत दहा दिवसांची मुदत दिली आहे. रस्ते दुरुस्त होत नाही, तोपर्यंत टोल बंदची मागणी योग्य आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असताना टोल का द्यायचा? असा सवाल राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित केला आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दूरावस्था (Potholes) झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर (Mumbai Nashik High way) तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी अधिकचा कालावधी लागत आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर खड्डे असताना टोल का द्यायचा?
नाशिक-मुंबई महामार्गाच्या अवस्थेवर छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, नाशिक-मुंबई महामार्गावरील 25 किमी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावरून अवजड वाहने हळू चालतात व त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अधिकाऱ्यांनी महामार्गाकडे लक्ष दिले पाहिजे. दहा वर्षांपासून रस्त्याचे काम पाहत आलो आहे. आता रस्ते दुरुस्तीबाबत दहा दिवसांची मुदत दिली आहे. काही अधिकाऱ्यांना निलंबीत करावेच लागेल, असा इशारा देत रस्ते दुरुस्त होत नाही, तोपर्यंत टोल बंदची मागणी योग्य आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असताना टोल का द्यायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी दिल्लीत जाणे काही गैर नाही
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक गोष्टी घडतात. जागा वाटपाच्या दृष्टीने काँग्रेसचे लोक देखील दिल्लीत जातात. येथील अनेक प्रश्न हे दिल्लीत सोडविले जातात. यामुळे महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी दिल्लीत जाणे काही गैर नाही, असे त्यांनी म्हटले.
तपासाअंती सत्य बाहेर येईल
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, सचिन वाझे यांच्याविषयी मला सविस्तर माहिती नाही. गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने ते याप्रकरणाविषयी माहिती घेतील. तपासाअंती कोण खरे आणि कोट खोटे हे बाहेर येईल.
आरक्षणावरून गावागावात हेवेदावे वाढलेत
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. याबाबत ते म्हणाले की, आरक्षणावरून गावागावात हेवेदावे वाढू लागले आहेत. समाजाच्या दृष्टीने हे योग्य नाही. यामुळे आरक्षणात सर्वांनीच लक्ष घालून तो प्रश्न सोडवावा, या करता मी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांची तब्येत बरी नसताना त्यांनी मला भेट दिली, त्याबद्दल आभारी असल्याचे भुजबळ म्हणाले.
आणखी वाचा
राज्य सरकारनं शरद पवारांना विश्वासात घेतलं नाही यात तथ्य असणं शक्य, नेमकं काय म्हणाले भुजबळ?