नाशिक- मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे स्पॉंडिलिसिसचा त्रास, भुजबळांनी दिला अल्टीमेटम
Chhagan Bhujbal In Nashik : नाशिक मुंबई रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने आपण गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांना तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
Chhagan Bhujbal In Nashik : नाशिक- मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे स्पॉंडिलिसिसचा त्रास सुरू झाला आहे. सद्यस्थितीत रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र एक नोव्हेंबर पासून आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असे वागावे, असा इशारा आमदार छगन भुजबळ यांनी दिला आहे. नाशिक शहराचे माजी पालकमंत्री तथा आमदार छगन भुजबळ आज पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी एअरबससह विविध मुद्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केलेल्या नाशिक मुंबई महामार्गाबाबत सूचक विधान केले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे स्पॉंडिलिसिसचा त्रास सुरू झाला असून येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत रस्त्यांची काम झाली तर ठीक अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
ते म्हणाले की, नाशिक मुंबई रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने आपण गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांना तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास एक नोव्हेबर पासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. अद्यापही बरेच काम बाकी आहे. आमचे या कामाकडे बारकाईने लक्ष आहे. आंदोलनाची देखील तयारी आमची पूर्ण झालेली आहे. काम न झाल्यास टोल बंद करण्यासोबत नॅशनल हायवे कार्यालय आणि संबंधित कंपन्यांच्या कार्यालयांमध्येही आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच नितीन गडकरी यांनी एक वर्षांपूर्वी नाशिक येथील कार्यक्रमात नाशिक मुंबई हायवे हा काँक्रीटीकरण सिक्सलेन करू असे आश्वासित केले होते. या कामासाठी आगामी काळात पाठपुरावा केला जाईल. तसेच हे काम जर लवकर होणार नसेल तर दरपाच वर्षांनी या चौपदरी रस्त्यांचे नुतनीकरण करण्याची अट आहे. त्या दृष्टीने आम्ही पाठपुरावा करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
नको त्या प्रश्नांवर जोर....
देशात महागाई, बेरोजगारी, अतिवृष्टी यासह अनेक प्रश्न समोर असतांनाही नको त्या प्रश्नांना उकळ्या फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, दुर्गम भागातील शाळा बंद करू नयेत, आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा गरजेच्या आहे. त्यांना चांगलं शिक्षण मिळत का नाही हे प्राधान्याने बघावे शाळांचा दर्जा वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.