मोठी बातमी! माजी मंत्री बबनराव घोलपांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, शिंदे गटाच्या वाटेवर
Babanrao Gholap : माजी मंत्री बबनराव घोलप हे शिवसेना ठाकरे गटाला आज 'जय महाराष्ट्र' करणार आहेत. ठाकरे गटात नाराज असलेले बबनराव घोलप हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
Babanrao Gholap नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
बबनराव घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी याआधी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घोलप यांनी आपली बाजूही मांडली होती.
उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर असताना बबनराव घोलप अनुपस्थित
ठाकरे गटाकडून घोलप यांची कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याने गेल्या महिन्यात नाशिकमध्ये (Nashik) झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील ते उपस्थित राहिले नाही. तसेच ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
शिंदे गटात करणार प्रवेश
चर्मकार समाज संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी अशा विविध समाजाच्या संघटनांच्या बैठका त्या दिवशी आयोजित केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्मकार समाजाच्या 90 टक्के मागण्या मान्य केल्या असल्याचे माजी मंत्री घोलप यांचे म्हटले आहे. आता नाराज असलेले बबनराव घोलप यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शिंदे गटाच्या वाटेवर असून दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
काय म्हणाले बबनराव घोलप?
मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने (संघटनेने) जे जे सांगितले, ते प्रामाणिकपणे केले आहे.पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुनवरुन मला काढुन मला अपमानित करण्यात आले व मी ज्यांना निष्क्रीय पदाधिकारी काढून टाकले होते. नवीन पदाधिकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठच ठेवल नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संर्पक प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे बिकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहून मी अचंबित आहे.नेमक माझ काय चुकल ते समजल नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तर मिळाले नाही. माझे वकीली करणारेही गप्प आहे. त्यापेक्षा आपण थांबून घेणे महत्वाचे वाटते. म्हणून मी माझा शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे, असे बबनराव घोलप यांनी म्हटले आहे.