(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : मांजराचा पाठलाग करत बिबट्या विहीरीत पडला, विहिरीत बिबट्याला भिडली मांजर, वाचा काय घडलं?
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये विहिरीत पडलेला बिबट्या आणि मांजर आमने-सामने आल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. विहिरीत बिबट्या आणि मांजर आमने-सामने आल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्यासह मांजरीची सुटका केली आहे.
नाशिकसह जिल्हाभरात बिबट्याचा (Leopard) वावर दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही समोर येत आहेत. तर काहीवेळा भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला बिबट्या विहिरीत पडल्याचे देखील समोर आले आहे. सिन्नर (Sinner) तालुक्यातील टेंभूरवाडी येथे या घटनेचा प्रत्यय आला आहे. मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह (Cat) विहिरीत पडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर मांजरीने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. यानंतर वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्यासह मांजरीची सुटका केली आहे. #Nashik #Sinner pic.twitter.com/pUUC6RCbn6
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) February 14, 2023
नाशिकसह निफाड, सिन्नर (Sinner) येवला परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याचबरोबर बिबट्याचे हल्ले देखील वाढले आहेत. यामुळे सिन्नरसह परिसरात दहशत पसरल्याचे चित्र आहे. अशातच तालुक्यातील टेंभुरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडला. तर कसा? या शेतातून बिबट्या जात असताना अचानक त्याच्या समोर मांजर दिसली. मांजरीला पाहताच बिबट्याने मांजरीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मांजर अन् बिबटची नजरानजर होताच मांजरीने धूम ठोकली. यावेळी पळत असताना दोघांनाही विहिरीचा अंदाज आल्याने मांजरीसह बिबट्या विहिरीत पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव वाचवण्यासाठी विद्युत मोटार ठेवण्यासाठी विहिरीत लावलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेतला.
दरम्यान मांजरीनेही जीव वाचवण्याची धडपड करत पाण्याच्या कडेला पोहोत जाऊन थेट बिबट्याच्या शेपटीलाच पकडत पाण्यावर तरंगून राहिली. सकाळी विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकताच सांगळे यांनी विहिरीत डोकावून बघितले असता बिबट्या व मांजर पाण्यात पडलेले त्यांना दिसून आले. यावेळी मांजर चक्क बिबट्याच्या शेपटीला धरून बसलेली त्यांना दिसून आली. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे सेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्या व मांजरीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या सेवकांकडून अथक परिश्रम सुरू आहे. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली आहे.
बिबट्या मांजर आली समोरासमोर...
जेव्हा आज पहाटेच्या सुमारास बिबट्या आणि मांजर समोरासमोर आल्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. भक्ष्याच्या शोधार्थ आलेल्या बिबट्याने मांजरीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. दोघेही विहिरीत पडले, मात्र यावेळी विहिरीतील मोटरचा आधार घेत दोघेही एकमेकांसोबत बाहेर येण्यासाठी धडपडू लागले. शेवटी वनविभागाने घटनास्थळी जाऊन दोघांनाही रेस्क्यू केले.