Nashik Crime : मालेगाव तालुका हादरला, मुलांनी पैशांसाठी आईला, तर अज्ञाताने शेतकरी महिलेला संपवलं!
Nashik Crime : मालेगाव तालुका हादरला असून एकाच दिवशी दोन महिलांच्या खुनाच्या घटना समोर आल्या आहेत.
Nashik Crime : मालेगाव (Malegoan) तालुका हादरला असून एकाच दिवशी दोन महिलांच्या खुनाच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दहिदी आणि दाभाडी परिसरात खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन्ही महिलांचा अतिशय निघृणपणे (Murder) जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील गुन्हेगारी (Crime) पोलिसांना आव्हान देणारी ठरत आहे. तर दुसरीकडे पोलिसांचा वचक नसल्याने सामान्य नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. अशातच मालेगाव तालुक्यातील दहिदी आणि दाभाडी परिसरात एका महिलेचा शेतात खून करण्यात आला तर दुसऱ्या महिलेला स्वतःच्या मुलांनी ठार केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पहिल्या घटनेत दहिदी येथील शेतकरी महिलेचा अतिशय क्रूरपणे खून केल्याची घटना मंगळवारी (31 जानेवारी) समोर आली. सुमनबाई भास्कर बिचकुले असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शेताजवळील जंगलात त्यांच्या शरीराचे तुकडे करुन फेकून देण्यात आले होते. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरीराचे तुकडे करुन फेकले
दरम्यान बिचकुले कुटुंबीयांची दहिदी गावाजवळ शेती आहे. शेतात त्यांचे राहते घर असून, सोमवारी सकाळी सुमनबाई मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती भास्कर हे शेतमाल विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी भास्कर घरी आल्यावर पत्नी घरी नसल्याने ते शेतात पाहण्यासाठी गेले. तेथे त्या नसल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून शोध सुरु केला. शेतात रक्ताने माखलेले फावडे आढळले आणि शेतापासून एक किमी अंतरावरील जंगलात सुमनबाई यांचे शीर, धड, पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांच्या खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळता तालुका पोलीस श्वानपथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावात आणण्यात आल्यानंतर मंगळवारी शोकाकूल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला.
दोघा मुलांनी घोटला जन्मदात्या आईचा गळा
आर्थिक वादातून दोघा पोटच्या मुलांनी जन्मदात्या आईचा गळा घोटून खून केला. हा प्रकार दाभाडीच्या गिसाका कॉलनीत सोमवारी (30 जानेवारी) सकाळी घडला असून मंगळवारी गुन्हा दाखल झाला. सुलकनबाई किसन सोनवणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या दोघा, मुलांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलकनबाई या मोठा मुलगा भगवान किसन सोनवणे व लहान मुलगा संदीप किसन सोनवणे यांच्यासोबत राहत होत्या. पैशांच्या कारणावरुन दोन्ही मुले त्यांच्याशी वाद घालत होते. त्यातून भगवान आणि संदीप यांनी सुलकनबाई यांचा दोरीने गळा आवळून खून केला. प्रारंभी दोघांनी सुलकनबाईने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दोघांनी गळा घोटून मारल्याची कबुली दिली. सुलकनबाई यांचे पती गिसाका कारखान्यात वॉचमन होते. पतीच्या मृत्यूनंतर सुलकनबाई यांनी मुलांचा सांभाळ केला. पतीला मिळालेल्या पैशांतून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. याच पैशाची सातत्याने मागणी करुन मुले त्यांच्याशी वाद घालत असल्याचे समोर आले आहे.