Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
Amit Shah Nashik Visit : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. आता अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर येत आहे.
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये (BJP) आहेत की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Sharad Pawar Group) आहेत? यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यातच एकनाथ खडसे हे एबीपी माझाच्या कट्ट्यावर (ABP Majha Katta) आले असता त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले होते. भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता भाजपच्या पक्ष प्रवेशावर आता फुली मारल्याचे त्यांनी म्हटले होते. एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले होते. आता केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) हे 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात खडसेंच्या पक्ष प्रवेशावर चर्चा होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 25 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बाहेरील राज्यातून आलेले प्रभारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रच्या 8 पैकी केवळ 2 जागांवर महायुतीचा विजय झाल्याने भाजप विधानसभेसाठी रणनीती आखणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी रावसाहेब दानवे आज नाशिकमध्ये येणार आहेत. या दौऱ्यावर एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत निर्णय होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे उपस्थित राहणार?
दरम्यान, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आज जळगावमध्ये आहेत. या यात्रेला एकनाथ खडसे उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आजच्या जळगावमधील घडामोडींवर एकनाथ खडसे यांच्याबाबतचा पुढचा निर्णय हा भाजपमधून घेतला जाईल, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीतच राहणार की भाजपमध्ये प्रवेश करणार? याकडे आता उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा