Ajit Pawar : 'मी एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झालं तरी मागं हटत नाही'; अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी!
Ajit Pawar : मी शब्द फिरवत नाही. एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झाले तरी मागे हटत नाही, हा अजित दादाचा वादा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
![Ajit Pawar : 'मी एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झालं तरी मागं हटत नाही'; अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी! Ajit Pawar Full Speech at Kalwan Surgana Vidhan Sabha Constituency 736 crore development works of Bhoomi Pujan and farmers meeting Nashik Maharashtra Marathi News Ajit Pawar : 'मी एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झालं तरी मागं हटत नाही'; अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/02/1fb337d1ce1f6dbad751d2811733a9581722592084845923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : मी शब्द फिरवत नाही. एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झाले तरी मागे हटत नाही, हा अजित दादाचा वादा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात (Kalwan-Surgana Vidhan Sabha Constituency) 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यातून ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. तिथल्या विकासासाठी 82 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही आमची भावना आहे. मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याने 2 हजार 200 कोटींचा निधी कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांना दिला आहे. या आधीच्या आमदारांनी काय केले आहे? नितीन पवार आणि इतर आमदार माझ्या सोबत असल्याने मी निधी देऊ शकलो. महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. आर्थिक बाबतीत महिला सक्षम झाल्या पाहिजेत. अडीच लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मदत देण्याची भूमिका मी मांडली. मोलमजुरी, धुणी भांडी करणाऱ्या माय माऊलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर रक्षाबंधनाच्या जवळ दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिले.
हा अजित दादाचा वादा
ते पुढे म्हणाले की, आम्ही शेतकरी आहोत. गोरगरिबांच्या विकासासाठी 46 हजार कोटी खर्च करावा लागणार आहे. हा चुनावी जुमला असल्याचे विरोधक बोलताय, पण तसे नाही. मी शब्द फिरवत नाही. एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झाले तरी मागे हटत नाही, हा अजित दादाचा वादा आहे. वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात देणार आहोत. तरुणांना स्टायपेंड देणार आहोत. 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. कोतवाल, पोलीस पाटलांना मानधन दिले आहे. भुपेंद्र यादव यांच्यासोबत आदिवासी आमदारांची बैठक मुंबईत किंवा दिल्लीत लावून देतो. हतगडच्या विकासासाठी 100 कोटी निधी मंजूर केला आहे. नितीन पवारला तुम्ही निवडून दिले, तो आमच्या मागे आहे. म्हणून तुम्हाला योजना लागू करता आल्या, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राज्य दिवाळखोरीत अजिबात काढले नाही
विरोधक टीका करतात की, राज्य दिवाळखोरीत काढले आहे. राज्य दिवाळखोरीत अजिबात काढले नाही. मी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. निवडणूकमध्ये आमच्या विचारांची माणसे निवडून द्या, या योजना बंद होणार नाहीत, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. वन पट्ट्याच्या प्रश्नाबाबत दरवर्षी तुम्ही मोर्चे काढून मुंबईत येतात. त्याबाबत लक्ष घातले आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपल्या भागातील काम करण्याची धमक आणि ताकद आमच्यात आहेत, बाकी कोणातही नाही, असेही अजित पवार म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)