Nashik Bribe News : नाशकात एसीबीची मोठी कारवाई, मध्यवर्ती कारागृहाचे दोन डॉक्टर लाच स्वीकारताना जाळ्यात
Nashik Bribe News : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात लाच घेताना कारागृहातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना एसीबीने अटक केली आहे.
Nashik Bribe News नाशिक : शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical certificate) देण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची लाच घेताना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या (Nashikroad Central Jail) दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना (Doctor) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. डॉ. आबिद आबू अत्तार (40), डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (42) रा. इंदिरानगर, नाशिक अशी या लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे मित्र हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. तसेच ज्या कैद्याने 14 वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्या कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते.
तीस हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात
या सर्टिफिकेटसाठी दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या मित्रांकडे चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले. पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, राजेंद्र सानप, हवालदार प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, हवालदार संतोष गांगुर्डे, किरण धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महावितरणच्या लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याला पोलीस कोठडी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपळगाव बसवंत येथे व्यावसायिकाकडून एक लाखांची लाच स्वीकारणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला एसीबीने अटक केली होती. या उपकार्यकारी अभियंत्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर येवल्यात लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किसन भीमराव कोपनर असे महावितरण कंपनीतील उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिकाचे इलेक्ट्रिक मीटर काढून घेऊन त्याठिकाणी इंडस्ट्रीयल इलेक्ट्रिकल मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात एक लाखांच्या लाचेची मागणी केली आणि लाच पंचासमक्ष स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर कोपनर यास रंगेहाथ अटक करीत पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल केला. कोपनर यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी वाचा