Nashik : 'तू बाहेर ये, तुझ्या दोन थोबाडीत देतो', मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल
Nashik Crime News : नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पती, पत्नीसह मुलावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime News : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) काल (दि. 20) मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल, सरस्वतीनगर येथील बुथ क्र. 88 वर मतदान केंद्रावर मतदान रू असताना बुथसमोरील आठ ते दहा मतदारांच्या रांगेमधून सर्व मतदारांना ओलांडून बुथमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न एका कुटुंबाकडून करण्यात आला. यावेळी रांगेमध्ये येण्याची विनंती करीत असलेल्या केंद्र प्रमुखास धमकी देत हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, पत्नीसह मुलावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण सरदारसिंग परदेशी (60), अक्षय अरूण परदेशी (24, रा. फ्लॅट नंबर ओ २४, सुशिलनगरी, माने नगर, रासबिहारी रोड, म्हसरूळ) असे संशयितांची नावे असून, यात एका महिलेचा समावेश आहे. सरस्वती नगर येथील के के वाघ इंग्लिश स्कूल येथे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना पती, पत्नीसह त्यांच्या मुलाने गोंधळ घातल्याची घटना घडली. मतदान केंद्र प्रमुखाशी अरेरावी करत 'तु बाहेर ये, तुझ्या दोन थोबाडीत देतो. तु काम संपवून बाहेर ये मग तुझ्याकडे पाहतो, अशी धमकी मतदान केंद्र प्रमुखांना देण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यांनाही दिली धमकी
त्यानंतर केंद्र प्रमुखांनी ही बाब म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांना सांगितली. यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी पती, पत्नीस समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना पत्नीने पायातील चप्पल काढून पोलीस अधिकाऱ्यावर धावत जावून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शिवीगाळ केली. डीजी ऑफीसमध्ये माझे भाऊ आहेत. मी तुला त्यांच्यासमोर हजर करतो. तुला वर्दीची जास्त मस्ती आली आहे. मी तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी यावेळी पोलिसांना देण्यात आली.
म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केंद्र प्रमुख पोलीस वाहनातून पोलीस ठाण्याला जाण्यासाठी निघून कॉलेजच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून प्रकरण शांत होण्यासाठी काही काळ रस्त्याचे बाजूला थांबले असता पती, पत्नीने पुन्हा पोलिसांच्या वाहनाजवळ जात दरवाजा उघडून त्यास बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात सुहास विलास धारणे (49, रा. फ्लॅट नं ३, हर्षवर्धन सोसायटी, मखमलाबाद नाका) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
Nashik : नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड, गुन्हेगारी रोखणे पोलिसांपुढे मोठं आव्हान