Horse Market : देशातील सर्वात जुन्या सारंगखेडा घोडेबाजाराला 21 डिसेंबरला सुरुवात, आतापर्यंत 700 हून अधिक घोडे दाखल
देशभरातून घोडे (Horse) विक्रीसाठी इथे दाखल होत असतात. घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. आतापर्यंत जवळपास 700 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत.
नंदुरबार : देशातील सर्वात मोठा अश्वबाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा (Sarangkhda) इथल्या घोडेबाजाराला 21 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या घोडेबाजाराचं खास वैशिष्ट्य असलेल्या चेतक फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षीच्या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धा आणि प्रीमियर लीग. देशभरातून घोडे (Horse) विक्रीसाठी इथे दाखल होत असतात. घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. आतापर्यंत जवळपास 700 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत.
देशातील सर्वात जुना अश्व बाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडेबाजाराची ओळख आहे. देशभरातून घोडे विक्रीसाठी येथे दाखल होत असतात घोड्यांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होत असते यावर्षी सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे आतापर्यंत जवळपास 700 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत.या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धाना देशभरातील अश्व प्रेमी या ठिकाणी हजेरी लावत असतात. यावर्षी चेतक फेस्टिवल मध्ये घोड्यांच्या स्पर्धा सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे करण्यात आले आहे
देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल
डिसेंबरमध्ये घोडेबाजार भरायला सुरुवात होते. बाजारात उंची किमतीचे दर्जेदार घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारासाठी अनेक व्यापारी ठेवणीतले घोडे विक्रीस आणत असतात. या बाजारात पंचकल्याणी, नुखरा, अबलख, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. यात 6 महिन्यापासून एक वर्षापर्यंतच्या दर्जेदार घोड्यांच्या पिल्लांची किंमत सध्या जास्त असली तरी त्यांनाच मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
अशी ठरते अश्वाची किंमत...
घोड्यांच्या अंगातील जन्मजात असलेले रूप, स्वभाव, शुभ गुण आणि खुणा यावर घोड्यांच्या किमती असल्या तरी त्याची चाल, रपेट, नाचकाम, रुबाबदारपणा याचीही पाहणी खरेदीदार करून त्याची किंमत ठरावीत असतात. घोड्यांचे नखरे हे त्याच्या सौंदर्याचे प्रतीक असते आणि या बाजारात अशाच अनेक घोड्यांचे नखरे अश्व शौकिनांना आकर्षित करत असतात. घोड्याची ऐटबाज चाल आणि धावण्याची पद्धत याचीही प्रात्यक्षिके खरेदीदारांच्या समोर केली जात असून त्यानंतर घोड्यांची विक्री होत आहे. घोडेबाजार यंदा विक्रमी होण्याची शक्यता असून यंदा कोट्यवधीची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.