(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar News : वर्षभरापासून खड्ड्यांमुळे नागरिक हैराण, मात्र गिरीश महाजन यांच्या दौऱ्यामुळे तळोद्यातील खड्डे भरण्यास सुरुवात
Nandurbar News : मंत्री येणार म्हणून तळोदा रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. गिरीश महाजन येत असल्याने तळोदा संत सावता माळी चौक ते प्रवेशद्वारापर्यंत रस्ता, खड्डे दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
Nandurbar News : राज्याचे ग्रामविकास आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) 15 नोव्हेंबर रोजी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत तळोदा (Taloda) इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून तळोदेकर नागरिक ज्या खड्ड्यांमुळे हैराण होते ते खड्डे (Potholes) भरण्यास आता तळोदा नगरपालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. मंत्री येणार म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. तळोदा शहरात गिरीश महाजन येत असल्याने तळोदा संत सावता माळी चौक ते प्रवेशद्वारापर्यंत रस्ता, खड्डे दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
मागील वर्षभरापासून या परिसरामध्ये खड्ड्यांमध्ये वाढ झाली होती. तसेच पावसाळ्यात तर खड्ड्यांनी कहरच केला होता. मात्र याकडे पालिका प्रशासनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु राज्याचे मंत्री महोदय तळोदा इथे येणार असल्याने या रस्त्याची साफसफाई आणि खड्डे भरण्याचं काम जलद गतीने सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना येणाऱ्या अडचण व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अनेकदा मांडून देखील लक्ष न देणाऱ्या पालिकेने मंत्र्याचा दौरा असल्याकारणाने या रस्त्याचे भाग्य उजळले आहे.
रस्ता पूर्ण करता ठेकेदाराने बिले काढल्याचा गावकऱ्यांचा आरोप
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील इजिमा 45 ते पाडामुंड गावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर रस्ता पूर्ण न करता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन बिले काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 25 मे 2017 रोजी इजिमा 45 ते पाडामुंड रस्त्याचा कार्यरंभ आदेश प्राप्त झाला होता. आदेशानुसार हे काम 12 महिन्यात म्हणजेच 24 मे 2018 पर्यंत काम पूर्ण करणं आवश्यक होतं. परंतु अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही किंवा सुरु झालेले नाही. संबंधित विभाग कार्यकारी अभियंत्याने ठेकेदारासोबत संगमताने रस्ता हडप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काम झालेलं नसतानाही संबंधित ठेकेदाराला कार्यकारी अभियंत्याच्या विभागामार्फत संपूर्ण रक्कम दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. हा रस्ता 2016-17 मध्ये मंजूर झालेला आहे आणि 2022 वर्ष संपत आलं तरी अद्यापपर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही. रस्ता अपूर्ण असल्याने गावातील बालकांचे, वयोवृद्ध, गरोदर महिलांचे हाल होत आहेत. या रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू, असा इशारा पाडामुंड ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.