Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा मोबाईल हॅक झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. हिना गावितांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय.
![Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप Nandurbar Lok Sabha Constituency BJP Candidate Heena Gavit s Mobile Hacked Serious Allegation Against Congress gowaal padavi Maharashtra Politics Marathi News Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/f7368de8e92093297a16317e640817761715608397014923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hina Gavit Mobile Hack : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या (Nandurbar Lok Sabha Constituency) भाजपाच्या (BJP) उमेदवार डॉ. हिना गावित (Hina Gavit) यांचा मोबाईल हॅक झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. मोबाईल हॅक करून काँग्रेसकडून (Congress) अपप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केला आहे.
या प्रकरणी डॉक्टर हिना गावित यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना देखील याला दुजोरा दिला आहे. काँग्रेसला पराभव दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप डॉक्टर हिना गावित यांनी केला आहे.
फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
याबाबत हिना गावित यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट करत मतदारांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. मतदारांनी दक्ष रहावे, अशा कुठल्याही कॉलवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन हिना गावित यांनी केले आहे.
हीना गावित यांचा काँग्रेसवर आरोप
हिना गावित म्हणाल्या की, या निवडणुकीत मतदारांचा वाढता कौल पाहता काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी आता रडीचा डाव खेळायची सुरुवात केलीये. माझ्या मोबाईल नंबरला हॅक करून माझ्या मोबाईल नंबरवरून लोकांना फोन केले गेले. काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करून मतदारांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून करण्यात आले, असा आरोप हिना गावित यांनी केला आहे. घडलेल्या प्रकारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या रडीच्या डावाला जनता नक्कीच उत्तर देईल. माझ्या नंबरवरून जर कुठलेही फोन आले तर मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
नंदुरबारमध्ये 60.60 टक्के मतदान
दरम्यान, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पडली. नंदुरबारमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान झाले. नंदुरबारमधून महायुतीकडून भाजपच्या हिना गावित तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गोवाल पाडवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महायुतीच्या अनेक नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. तर गोवाल पाडवी यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या. आता हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवी या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)