Nanded Rain : पूर स्थितीमुळं नांदेड जिल्ह्यातील 80 गावांचा संपर्क तुटला, अतिवृष्टीमुळं शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश
नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळं 80 गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळं शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.

Nanded Rain : सध्या मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळं 80 गावांचा संपर्क तुटला आहे. शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं दोन दिवसांपासून शाळा बंद होत्या. आजही (14 जुलै) अतिवृष्टीमुळं शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचे दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, पैनगंगा, मांजरा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर नांदेड शहराची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 84.21 टक्के क्षमतेने भरला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, हदगाव, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली, नांदेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सखल भागात राहत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरु असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र संभाव्य परिस्थिती लक्षात घेता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोणातून पाटबंधारे विभागाने विष्णुपुरीचे सात दरवाजे उघडले आहेत. या प्रकल्पात दिग्रस बंधारा, पुर्णा नदी व मुक्त पाणलोटातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत आहे. सोडण्यात येणारे हे पाणी बळेगाव, बाभळी प्रकल्पाद्वारे पोचमपाड प्रकल्पात जाते. पोचमपाड प्रकल्पाचे दरवाजे जर बंद ठेवले तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गोदावरीतील पाणीसाठ्यावर होऊन मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. यामुळे स्वाभाविकच नदीकाठचे गावे पाण्याखाली येतात.
शेती पिकांचं मोठं नुकसान
नांदेड जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. तसेच ठिबक, बैलगाडी, नांगर, पेरणीयंत्र अशी शेतीची अवजारेही वाहून गेली आहेत. तर दुसरीकडं पिके तर वाया गेलीच पण जमिनीही खरवडून गेल्याचे चित्र आहे. यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ तर आलीच, पण ज्या अवजारांनी पेरणी करतो, ती कृषी अवजारेच वाहून गेल्याने, आता ती पुन्हा खरेदी करण्याचीही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Weather Report : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस, गुजरातसह महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा इतर राज्यातील पावसाची स्थिती
- Gadchiroli Rain : गडचिरोलीतील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 10 मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
