Meenakshi Shinde: ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने पुढील काळात ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना पुन्हा तिकीट देऊ नये, यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केले होते.

Meenakshi Shinde: महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असतानाच ठाण्यात शिवसेना शिंदे गटात वाद उफाळून आला. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर प्रभावीपणे काम करता येत नसल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा सादर केला असला होता. दरम्यान, काल (25 डिसेंबर) पदाचा राजीनामा दिलेल्या मीनाक्षी शिंदे यांच्याशी स्वतः एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी मीनाक्षी शिंदे यांना राजीनामा स्वीकारणार नसल्याचे कळवलं. एकनाथ शिंदे म्हणाले, तुमची नाराजी दूर होईल. ज्या शाखाप्रमुखांसाठी तुम्ही राजीनामा दिला त्याबद्दल देखील आपण चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
मी शिवसेना सोडून कुठेच जाणार नाही
दरम्यान, माझे आडनाव शिंदे आहे. मी शिवसेना सोडून कुठेच जाणार नाही. नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा नाही, असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या. या सर्व प्रकरणामध्ये ज्याने कोणी वरिष्ठांकडे तक्रार केली त्याने आधी नीट समजून घेतले पाहिजे होते. शब्दाचा विपर्यास करून सांगायला नको होते, असे म्हणत त्यांनी आपल्याच पक्षातील लोकांना टोला लगावला. दरम्यान, ठाणे शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने पुढील काळात ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना पुन्हा तिकीट देऊ नये, यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात विक्रांत वायचळ यांचा सहभाग होता. विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा का दिला?
पक्षविरोधी कारवाईच्या आरोपाखाली प्रभाग क्रमांक ३, मनोरमा नगर येथील शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतरच पक्षातील नाराजी वाढली आणि त्याचाच परिपाक म्हणून मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. वायचळ यांच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे अस्वस्थ होत्या, अशी माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ठाण्यात 131 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता आणि त्यावेळी मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्या शिंदे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. मात्र आता ठाण्यातील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एकीकडे ठाण्याचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील असताना, भाजपसोबत महायुतीतून निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याच वेळी ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने ठाण्यात शिंदे गटासमोर आव्हान वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















