(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded : '12 वर्षांनी मुलं झालं होतं, पण डॉक्टरांमुळे माझं बाळ गेलं'; आईने सुप्रिया सुळेंसमोर फोडला हंबरडा
Nanded Government Hospital : नांदेडमधील शासकीय रुग्णालयामधील मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढतच चालल्याचं पाहायला मिळतंय.
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) सुरु असलेल्या बालकांच्या मृत्यूनंतर अनेकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. तर मागील चार दिवसांत नांदेड शासकीय रुग्णालयात (Government Hospital) मृतांची संख्या ही 51 वर पोहचली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नांदेडमध्ये जाऊन या बालकांच्या पालकांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पालकांचे सांत्वन देखील केले. तर या पालकांनी देखील चांगलाच टाहो फोडला. मीडियाशी बोलतो म्हणून तुमच्या बाळावर उपचार करणार नाही, असा गंभीर आरोप देखील बालकांच्या कुटुंबियांनी केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी या कुटुंबियांचं गाऱ्हाणं देखील ऐकून घेतलं.
12 वर्षांनी मुलं झालं होतं
तब्बल 12 वर्षांनी झालेलं मूल दगावलं असल्याचं यावेळी कुटुंबियांनी सांगितलं. त्यामुळे ज्या मुलासाठी इतकी वर्ष वाट पाहिली तेच मूल डॉक्टरांच्या चुकीमुळे दगावलं असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. या लोकांची गाऱ्हाणी ऐकताना सुप्रिया सुळे देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बाळ व्यवस्थित होतं तरी डॉक्टरांनी त्याला अनेक मशिनी लावल्या असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्या बाळासाठी इतकी वर्ष वाट पाहिली तेच बाळ आता गेल्याने बाळाच्या आईच्या भावनांचा आणि अश्रूंचा बांध फुटला.
नांदेडमध्ये बालकांच्या मृत्यूचा आलेख वाढताच
नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूचा आलेख वाढतच चालला असून यामध्ये बालकांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळे या घटनेवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जातेय. नांदेड शासकीय रुग्णालयात मागील चोवीस तासांत एकूण 14 जणांचा मृत्यू झालाय. ज्यामध्ये तीन बालकांचा समावेश आहे. गेल्या चार दिवसांत या रुग्णालयात मृतांची संख्या 51 वर पोहचली आहे. 2 ऑक्टोबरला सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 3 ऑक्टोबरला सात जणांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबरला पुन्हा सहा रुग्णांचा जीव गेला आणि आता मागील 24 तासांत आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशणा
दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात भेट दिली. तर यावेळी त्यांनी सरकारवर देखील ताशेरे ओढले. हा राजकारणाचा विषय नसून, आरोग्य खाते आणि आरोग्य शिक्षण या दोन्ही विभागात मोठा अंतर निर्माण झालं असल्यांचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.