Nanded : चोवीस रुग्णांचा मृत्यूनंतर आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ, रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज; अशोक चव्हाणांची रुग्णालयास भेट
Nanded News : चोवीस रुग्णांचा मृत्यूनंतर रुग्णालयात असलेले आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ असून, या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
Nanded News : नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 24 रुग्णांचा मागील चोवीस तासांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील तापले असून, विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. तर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, चोवीस रुग्णांचा मृत्यूनंतर रुग्णालयात असलेले आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ असून, या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण यांनी घेतला रुग्णालयाचा आढावा...
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी तातडीने रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली. 24 मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश असल्याने या बातमीने खळबळ उडाली आहे. एवढे मृत्यू 24 तासात कसे झाले याबाबत चव्हाणांनी अधिष्ठातांकडून माहिती घेतली. धक्कादायक म्हणजे आणखी 70 रुग्ण हे अत्यवस्थ आहेत. सध्या या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचं मत चव्हाणांनी व्यक्त केले आहे. या रुग्णालयातील नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. तेव्हा तातडीने सरकारने याची दखल घ्यावी. ज्या कमतरता या रुग्णालयात आहेत, त्याची तातडीने पूर्तता करावी. तसेच घटनेची चौकशी करावी अशी मागणी चव्हाणांनी केली. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी उद्या नांदेडमध्ये आरोग्य संचालकांची समिती येणार आहे.
रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया...
छत्रपती संभाजीनगर येथून तज्ज्ञ डॉक्टरांची टिम नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागवण्यात आली आहे. या रुग्णालयात दररोज 5 ते 6 रुग्णांचे मृत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतात. गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होतांना अगोदरच अत्यावस्थ असतात. त्यामुळे त्यांच्या आजारावरील धोका वाढलेला असतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या उपलब्ध मनुष्यबळाद्वारे जास्तीत जास्त चांगले उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. मागील 4 ते 5 दिवसांपासून सलग सुट्या असल्यामुळे नांदेड आणि आसपासच्या ठिकाणचे डॉक्टर बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये अतिगंभीर रुग्णांना दाखल होता आले नाही. मागील 3 दिवसात जे जास्त संख्येने मृत्यू झाले, त्यांच्या आजाराची कारणे वेगवेगळी आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अथवा औषधीच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झालेला नसल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: