विधानसभेसाठी 33 जागा द्या, महायुतीतील आणखी एका पक्षाची मागणी; एक उमेदवारही जाहीर केला
maharashtra Assembly Election : विधानसभेच्या 33 जागा, राज्यसभेची एक आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये एक जागा मिळावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महायुतीकडे केली आहे.
नांदेड : महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता त्यामध्ये आणखी एका पक्षाने उडी घेतली आहे. विधानसभेसाठी आम्हाला 33 जागा द्या, आगामी राज्यसभेच्या निवडणुकीक एक जागा द्या अशी मागणी पीपल्स रिपब्लिक पार्टीने केली आहे. महायुतीमध्ये आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेसाठी एक उमेदवारही जाहीर केला आहे.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाने (कवाडे गट - Peoples Republican Party) नांदेडमधील देगलूर मतदारसंघातून बापूराव गजभारे यांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी ही घोषणा केली. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणीही केली.
विधानसभेच्या 33 जागा आणि राज्यसभेवर संधी द्या
जोगेंद्र कवाडे म्हणाले की, आगामी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला एका जागेवर संधी देण्यात यावी. तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतही एका जागा मिळावी. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाला 33 जागा मिळाव्यात. जरी तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तरी किमान 5 जागांसाठी आम्ही आग्रही असणार आहोत.
एकनाथ शिंदे जागा देतील
जोगेंद्र कवाडे म्हणाले की, पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये एक वाटा मिळाला पाहिजे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर ते आमची मागणी मान्य करतील. विधानसभेसाठी आमची 33 जागांची मागणी आहे. पण किमान पाच जागा तरी मिळतील अशी अपेक्षा आहे.
विनय कोरे यांनी 15 जागा मागितल्या
महायुतीमधील आणखी एक घटकपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी आपल्याला 15 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा-शाहूवाडी, चंदगड आणि करवीर या जागा विनय कोरे यांनी महायुतीकडे मागितल्या आहेत. तसेच सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील एकूण 15 जागांची मागणी विनय कोरे यांनी केली आहे. त्यानंतर आता जोगेंद्र कवाडेंनीही 33 जागा मागितल्या आहेत.
महायुतीमध्ये जागावाटपामध्ये रस्सीखेच
महायुतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढेल याचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळव्यात यासाठी तीनही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात जागावाटपावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: