Weather Update: विदर्भात थंडीचा जोर वाढला, गोंदियात सर्वात कमी तापमान तर नागपुरात पारा 11.2 अंशांवर
विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद होते आहे. येथील तापमान 10 अंशांच्याही खाली गेले आहे. रविवारी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तो सरासरी पेक्षा तब्बल 5.3 अंशाने कमी होता.
Nagpur News : विदर्भात थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. नागपुरातही (Nagpur) थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. रविवारी शहरात किमान तापमान 11.2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. आतापर्यंत गुलाबी जाणवणारी थंडी आता बोचरी वाटू लागली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होत थंडी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी दुपारपर्यंत शहरातील तापमान 29.9 अंश सेल्सिअसपर्यंत होतं.
विदर्भातील (Vidarbha) जवळपास सर्वाच जिल्ह्यांमध्ये रात्र कुडकुडत काढावी लागत आहे. तर, दिवसाची कोवळी उन्हं हवीहवीशी वाटू लागली आहे. नागपुरातही तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे. रात्री आणि पहाटे वाहणारे बोचरे वारे त्रासदायक ठरत आहे. थंडीच्या कडाक्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. रविवारी रात्री अनेक वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक तुरळक जाणवली. रविवारी शहरात कमाल 11.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ते सरासरीपेक्षा 3 अंशाने कमी आहे. कमाल तापमान 29.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा 0.9 अंशाने कमी होते.
गोंदिया सर्वाधिक गारठला
विदर्भात गोंदिया जिल्ह्यात (Gondia District) सर्वात कमी तापमानाची नोंद होते आहे. गोंदियाचे तापमान 10 अंशांच्याही खाली गेले आहे. रविवारी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ते सरासरी पेक्षा तब्बल 5.3 अंशाने कमी आहे. गोंदिया गारठल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमधील नागरिक रात्री घराबाहेर पडणे टाळत आहेत. यामुळे ग्रामीण भागात रात्री शुकशुकाट दिसून येत आहे.
शहर व तापमान
शहर - किमान - कमाल
नागपूर - 11.2- 29.4
वर्धा - 12.4 - 30.5
गोंदिया - 9.8 - 28.4
चंद्रपूर - 14.0 - 27.2
ब्रह्मपुरी - 13.1 - 31.8
गडचिरोली - 12.6 - 29.0
महाराष्ट्रात काहीसा उकाडा
शुक्रवारपासूनच महाराष्ट्रात ढगाळ (Cloudy Weather) वातावरण पाहायला मिळालं. यामध्ये उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव कमी पडला आणि महाराष्ट्रातील गारवा काहीसा ओसरला. दुपारच्या वेळी सूर्याचा प्रकोप एकाएकी वाढल्यामुळं पुन्हा जीवाची काहिली झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, येते काही दिवस तापमानामध्ये हे अनपेक्षित बदल दिसतील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रात मात्र थंडी ओसरली
मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र ही थंडी काहीशी ओसरली आहे. हवामानातील या बदलाचे थेट परिणाम नागरिकांच्या प्रकृतीवर होताना दिसत आहेत.मान्सूननं जसं यंदाच्या वर्षी नवनवे विक्रमच प्रस्थापित केले तसंच हा हिवाळ्याचा ऋतूही नोव्हेंबरमध्येच विविध रंग दाखवू लागला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान कमी होऊ लागले आहे.