Nagpur Traffic Jam : अधिवेशन काळात नागपूरकरांना करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना, 'हे' मार्ग आहेत बंद
Nagpur Traffic Jam : नेहमीपेक्षा यंदाच्या अधिवेशन काळात नागपुरात अधिकची वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर नागपूर पोलिसांकडून कसे नियोजन केले जाते हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

नागपूर : आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरवात झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाकाळात होणारी वाहतूक कोंडी नागपूरकरांना (Nagpur) नेहमीप्रमाणे अपेक्षीत असते. मात्र, यंदा वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या जास्तच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अधिवेशन काळात नागपुरात प्रचंड वाहतूक कोंडी होईल का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण नागपुरात विधिमंडळाकडे येणारे मोठे मोर्चे ज्या मार्गावरून येतात, असे काही मार्ग सध्या नादुरुस्त पूल आणि उखडलेले रस्ते या कारणामुळे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा यंदाच्या अधिवेशन काळात नागपुरात अधिकची वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) कसे नियोजन केले जाते हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
विधिमंडळाकडे येणारे बंद असलेले प्रमुख मार्ग
- शहरातील पंचशील चौकाकडून सीताबर्डीकडे येणारा रस्ता 23 सप्टेंबरच्या महापुरानंतर सातत्याने बंद आहे. या मार्गावरील पंचशील चौकाजवळचा पूलाचा भाग पुरात खचला होता, तेव्हापासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून अधिवेशनावर धडकणारे सर्वात मोठे मोर्चे यशवंत स्टेडियमवरून विधिमंडळापर्यंत येतात. आता हा मार्ग बंद असल्यामुळे पर्यायी मार्गाने मोर्चे वळवावे लागतील आणि त्यामुळे विधिमंडळाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- पंचशील चौकाच्या बंद असलेल्या रस्त्याला समांतर रस्ता म्हणजे रामदास पेठेतून महाराज भागकडे येणारा रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरील युनिव्हर्सिटी लायब्ररी जवळचा पूल खचल्यामुळे गेले अनेक महिन्यांपासून बंद आहे. तिथे अत्यंत हळुवार गतीने काम सुरू आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अवतीभवती मोर्च्यांची गर्दी असताना रामदासपेठेतून महाराजबागकडे येणारा रास्ता सामान्य नागपूरकरांसाठी उपलब्ध असायचा.मात्र, सध्या नादुरुस्त पुलामुळे हा मार्गही बंद आहे.
- गांधीसागर आणि सेंट्रल एवेन्यूकडून येणारे मोर्चे रेल्वे स्टेशन जवळच्या किंग्स-वे मार्गातून मोहिनी कॉम्प्लेक्स जवळ येऊन थांबायचे. मात्र, किंग्स-वे वर एका बाजूला सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे, त्या रस्त्यावरून येणारे मोर्चेही येऊ शकणार नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
