मविआच्या निर्मितीमध्ये थोरातांचे मोठे योगदान, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे; सुनील केदारांंचं वक्तव्य अन्
Congress : तुम्ही कितीही आकाशाला पोहोचला तरी, तरीही थोरातांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आम्ही सांभाळू, असे म्हणत केदारांनी एक प्रकारे नाना पटोले यांना इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Pradesh Congress News : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमध्ये सुरु असलेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. या वादात आता एक-एक करून इतर नेतेही उड्या घेत आहेत. पक्षश्रेष्ठींकडून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे. यावर कॉंग्रेस नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कुठेतरी नाना पटोले यांना अडचणीत आणणारी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नसतानाही त्यांनी महाविकास आघाडीचे (MVA) गठन करण्यात यशस्वी मध्यस्थी केली होती आणि पक्षाला राज्यात मजबूत केले होते. त्यामुळे त्यांना डावलून कोणतेही निर्णय घेणे योग्य नाही. पक्षात त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, अशी भूमिका आज राज्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी मांडली. त्यांनी थोरातांची बाजू चांगलीच उचलून धरली आहे. त्यांची ही भूमिका कुठेतरी नाना पटोले यांना अडचणीत आणणारी ठरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्याचा विषय पक्षाच्या दृष्टिकोनातून अयोग्य
येत्या 10 तारखेच्या बैठकीबाबत विचारले असता, आमदार केदार म्हणाले, त्या बैठकीची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. कोणी हा पक्ष घरचा समजत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, असं जर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलले असतील, तर हा नियम सर्वांनाच लागू होईल, प्रत्येक पदाधिकाऱ्याला तो लागू व्हायला पाहिजे. 15 तारखेला बैठक आहे. या बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्यांचा आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडोमध्ये यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याच बैठकी पोटनिवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत. थोरात गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात आहेत. अनेक राजकीय घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. अनेक लोक इतर पक्षांत गेले, मात्र थोरात काँग्रेसमध्ये कायम आहेत. मात्र सध्या जो विषय पुढं येतोय, ते पक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. यामुळे पक्ष कुठेतरी मागे पडत चालला आहे. पक्षातील कलह पक्षातच सुटला पाहिजे, असे ठाम मत केदार यांनी मांडले.
'या' वाक्याने नाना पटोले यांना इशारा!
केंद्रातील पक्षश्रेष्ठी हा प्रश्न निकाली काढतील. मात्र केंद्रातील नेत्यांची गरज भरायला नको. पिढ्यान् पिढ्या निष्ठा ठेवणारे राज्यातील नेते हा प्रश्न निकाली काढतील, असा विश्वास केदारांनी व्यक्त केला. आमच्या पक्षाच्या अंतर्गत असलेला प्रश्न आम्हीच सोडवू. थोरात साहेबांचा सन्मान झालाच पाहिजे. तुम्ही कितीही आकाशाला पोहोचला तरी आणि तुम्ही कितीही मोठे झाले असे समजत असाल तरीही थोरात साहेबांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आम्ही सांभाळू, असे म्हणत केदारांनी एक प्रकारे नाना पटोले यांना इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.
ही बातमी देखील वाचा...