Sudhir Mungantiwar : फडणवीस म्हणाले, सुधीरभाऊंशी प्रदीर्घ चर्चा झाली होती; मुनगंटीवार थेटच म्हणाले, ते प्रदीर्घ वगैरे काही बोलले नाहीत
Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis : नितीन गडकरी आमचे मार्गदर्शक म्हणून भेट घेतली, देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी घाई नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
नागपूर : देवेंद्र फडणवीसांनी आपल्याशी मंत्रिपदाबाबत प्रदीर्घ चर्चा वगैरे केली नाही, विस्ताराच्या दिवशी ते फक्त बोलले असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी फडणवीसांनी केलेला दावा खोडून टाकला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आदल्या दिवशी आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचं फडणवीस आणि बावनकुळे यांनी सांगितलं होतं, पण मंत्रिपद मिळालं नाही असं सांगत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राज्यातील मंत्रिपद नाकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर देवेंद्र फडणवींनी स्पष्टीकरण दिलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सुधीर मुनगंटीवर यांच्याशी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आपण प्रदीर्घ चर्चा केली होती. जर मंत्रिपद मिळालं नसेल तर त्यांच्यासाठी पक्षाकडून काही मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
फडणवीसांशी प्रदीर्घ चर्चा झाली नाही
देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा हा सुधीर मुनगंटीवारांनी सपशेल फेटाळला. आमच्यात प्रदीर्घ अशी काही चर्चा झाली नाही. विस्ताराच्या दिवशी सकाळी फक्त बोलले होते. पण त्यावर प्रदीर्घ चर्चा अशी काही झाली नाही.
आदल्या दिवशी सांगितलं मंत्रिपद मिळणार म्हणून
मला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी सांगितलं होतं की तुमचं नाव मंत्रिपदासाठी आहे. शपथविधीच्या आदल्या दिवशी माझी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा बावनकुळे यांनी सांगितलं होतं की तुमचं नाव आहे. मात्र तेव्हा त्यांनी एक शंकाही उपस्थित केली होती. वरिष्ठांकडून काही निरोप आले, तर या यादीतून चार-पाच लोक कमी होतील असं ते म्हणाले होते. बावनकुळेंनी हेही सांगितलं होतं की आम्ही नाव पाठवली आहेत. मात्र केंद्रीय स्तरावरून जर प्रश्न उपस्थित करण्यात आला की मागच्या टर्ममध्ये जे मंत्री आहेत त्यांचे एवजी नवीन मंत्री घ्या तर चार पाच नाव कमी होऊ शकतात. आम्ही पाच-सहा जण मागच्या टर्मला मंत्री होतो. इतर मंत्र्यांच्या बाबतीत असं झालेले दिसत नाही.
देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार का?
मंत्रिपद नाकारल्यानंतर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार का असा त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आता लगेच काही गडबड नाही. मंत्रिपदाचं ओझं उतरलं आहे त्यामुळे त्याचा आनंद घेऊ द्या. काही भेटी गाठी राहिल्या आहेत त्या करू.
जे झालं ते झालं, आता मला त्याबद्दल चर्चा करण्यात कुठलाही आनंद नाही. आता विषय संपला आहे. आता मी आमदार म्हणून काम करणार आहे असं मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा
मंत्रिपद न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. मुनगंटीवार आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहीले. नागपुरातच असूनही कामकाजाला अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं. एबीपी माझाशी बोलताना मुनगंटीवारांनी नाराज नसल्याचं सांगितलं. मात्र मनातली खदखदही व्यक्त केली. मंत्रिपद मिळणार असं आपल्याला फडणवीस आणि बावनकुळे यांनी सांगितलं होतं असं त्यांनी एबीपी माझाला सांगितलं. मौनम् सर्वार्थ साधनम् असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
ही बातमी वाचा: