दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांचे जत्थे मुंबईकडे, दोन्ही गटांकडून व्यवस्था, शिंदे गटाने विदर्भातून केली तयारी
नागपूरच नव्हे तर विदर्भातील पदाधिकारी देखील आपल्या निकटवर्तीयांसह विमानाने मुंबई गाठणार आहे. यापैकी काहींचे आगमन नागपुरात झाले असून काही पदाधिकारी उद्या नागपुरात पोहोचणार आहेत.
Nagpur : राज्यातील सत्तांतरानंतर (Maharashtra Politics) शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबईत दसरा मेळाव्याच्या शक्तीप्रदर्शनासाठी जय्यत तयारी केली आहे. उपराजधानी नागपूरसह विदर्भातून यासाठी शिवसैनिकांचे जत्थे आज मुंबईच्या दिशेने निघाले. ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील पदाधिकाऱ्यांसह नागपूर जिल्ह्यातून 500 च्या आसपास शिवसैनिक तर, शिंदे गटाच्या (Eknath Shinde) नागपूरसह विदर्भातून सुमारे 10 हजारांवर शिवसैनिक रवाना होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
खासगी चारचाकीही सज्ज
ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी 15 दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. यात स्वतंत्र व्यवस्थासह रेल्वेचे आरक्षण (Railway Reservation) व स्वत:ची खासगी वाहने (Private Cars) तयार ठेवावीत अशी सूचना केली होती. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत शिवसैनिक आज, मंगळवारी निघणार असल्याचे सांगितले. अनेकांनी स्वत:च्या चारचाकीसह रेल्वेचे आरक्षणही करून ठेवले आहेत. नागपुरातून शिवतीर्थावरील दसरा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी नागपूरकर शिवसैनिक आपला खारीचा वाटा उचलेल असा विश्वास किशोर कुमेरिया यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केला.
विदर्भातून 120 बसेसची व्यवस्था, एक रेल्वे बुक होईल एवढे आरक्षण!
शिंदे गटाचे पूर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव (Kiran Pandav) यांनी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून 10 हजारांवर शिवसैनिक जाणार असल्याचा दावा केला आहे. संपूर्ण विदर्भातून यासाठी 120 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जवळपास एक रेल्वे बुक होईल एवढ्या संख्येत शिवसैनिकांनी आरक्षण केले आहे. याशिवाय, खासगी आणि भाड्याची वाहने घेऊनही मोठ्या संख्येत विदर्भातील शिवसैनिक बीकेसीच्या मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात हजेरी लावणार असल्याचे पांडव यांनी सांगितले. दसरा मेळाव्यासाठी यंदा दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार, पक्षाच्या नेतृत्वाकडून आधीच पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटांची ही जोरदार तयारी झाली आहे.
पदाधिकारींची विमानवारी
एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी राज्यातून नियोजन सुरु आहे. दुसरीकडे शक्तीप्रदर्शनासाठी एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते रेल्वे, खासगी बसेसे आणि चारचाकी गाड्यांनी जात आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना जरी रेल्वे, खासगी बसेसेने पुढे पाठवले असले तरी काही नेते उद्या विमानाने मुंबईकडे जाणार असल्याची माहिती आहे. यात नागपूरच नव्हे तर विदर्भातील पदाधिकारी देखील आपल्या निकटवर्तीयांसह विमानाने मुंबई गाठणार आहे. यापैकी काहींचे आगमन नागपुरात झाले असून काही पदाधिकारी उद्या नागपुरात पोहोचणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या