Sudhir Mungantiwar : नागपुरात होणार वन्यजीवांमधील आजारांवर संशोधन; राष्ट्रीय केंद्राला सुरुवात
प्राण्यांच्या आजारांसंदर्भातील संशोधनाची जबाबदारी आता नागपूर केंद्राने घ्यावी, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, या संशोधन केंद्राच्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी मुनगंटीवार यांनी दिले.
Nagpur News : जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांपासून मनुष्यांमध्ये जाणारे आजार वाढत आहेत. कोरोनासारख्या आजाराने त्याची भयानक दृश्ये जगाला दाखवली आहे त्यामुळे वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जागतिक दर्जाचे या संदर्भातील संशोधन नागपुरात व्हावे, अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली. नागपूरातील गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
ईशान्य भारतासह अन्य भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील या संशोधन केंद्राचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन या ठिकाणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणच्या वन्यजीव संशोधन केंद्रात होत असलेले हे संशोधन महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. वन्यजीवांपासून माणसांमध्ये येणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता मनुष्याचे आणि प्राण्यांचे वेगळे आरोग्य न बघता दोघांचेही एकच आरोग्य अशा पद्धतीने याकडे बघणे आवश्यक आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यालाच अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. मात्र या संशोधन क्षेत्रात भारताची भरारी अजून बाकी आहे. ही जबाबदारी आता नागपूरच्या केंद्राने घ्यावी, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, या संशोधन केंद्राच्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, माफसुचे कुलगुरु डॉ.आशिष पातूरकर, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.एस.व्ही. उपाध्ये, प्रकल्पाचे सल्लागार डॉ. अरुण कुमार रावत, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य वन्य संरक्षक वाय एल पी राव, आदींची यावेळी उपस्थिती होती.
गोरेवाडाचे पर्यटन महागणार; 15 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू
महागाईने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यानातील (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) प्रवेश शुल्कात दिलेली सवलत रद्द करण्यात आली. त्यामुळे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात पर्यटनासाठी पर्यटकांना जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. उद्घाटनाच्या वेळेस राज्य सरकारने एक वर्षासाठी 25 टक्के तिकिटावर सवलत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे अद्यापही ही सवलत सुरु होती. ती सवलत आता 15 नोव्हेंबरपासून रद्द करण्यात येणार असल्याने आता अधिकचे शुल्क मोजूनच गोरेवाड्यातील पर्यटनाचा आनंद घ्यावा लागणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 26 जानेवारी 2021 रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यानातील इंडियन सफारीचे उद्घाटन झाले. त्यावेळी सफारीसाठी निर्धारित केलेल्या दरात 25 टक्के सवलत एक वर्षासाठी जाहीर केली होती.
महत्त्वाची बातमी