उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर नागपुरात राजकीय महाभारत?
नागपूरच्या कळमना परिसरात जमिनीवर कोसळलेला हा उड्डाणपुलाचा एक भाग येणाऱ्या दिवसात नागपुरात राजकीय महाभारत घडवण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर : नागपूरमधील कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला. दुर्घटना घडली तेव्हा सुदैवानं काम बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उड्डाणपुलाच्या दोन पिलर दरम्यान सुमारे ५० ते ६० फूट लांबीचा एक भाग मधूनच तुटला आणि खाली कोसळला. जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा पुलाखालून वाहतूकही सुरू नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नागपूरच्या कळमना परिसरात उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. एका बाजूला महाविकासआघाडी मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष कालच्या दुर्घटनेबद्दल आंदोलन करत भाजपवर थेट हल्लाबोल करत आहेत. तर दुसर्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या घटनेसाठी बेयरिंग फेल्युर हे प्राथमिक कारण सांगत घटनेची दुहेरी चौकशी करण्याचे जाहीर केले आहे.
नागपूरच्या कळमना परिसरात जमिनीवर कोसळलेला हा उड्डाणपुलाचा एक भाग येणाऱ्या दिवसात नागपुरात राजकीय महाभारत घडवण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. पारडी परिसरातील एच बी टाऊन या अत्यंत जास्त वर्दळीच्या चौकावरून कळमना, इतवारी आणि भंडारा रोड या तिन्ही बाजूला जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कळमनाकडे जाणाऱ्या भागात काल रात्री साडेनऊ वाजता दुर्घटना घडली. उड्डाणपुलाच्या पिलर क्रमांक सात आणि आठ दरम्यानचा पिलर किंवा सेगमेंट अचानक पिलर क्रमांक सात वरून खाली कोसळला. सुदैवाने त्यावेळेस उड्डाणपुलाचा बांधकाम सुरू नसल्यामुळे तसेच खालच्या रस्त्यावरून कोणतीही वाहतूक नसल्यामुळे या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र दुर्घटना घडताच मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी त्या परिसरात जमली. मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही त्या ठिकाणी गोळा झाले आणि स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
आज सकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुर्घटनास्थळावर गोळा होऊन भाजप आमदार कृष्णा खोपडे, केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि त्यांच्या विभागाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत एक मोर्चाही काढला. स्थानिक आमदार खोपडे यांनी कंत्राटदाराला अवास्तव साथ देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांवर दबाव आणला आणि कामाच्या गुणवत्तेत दुर्लक्ष करायला लावला असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे
शिवसेनेच्या आंदोलन थोड्यावेळानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिव्हिल लाईन परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. नारंग टॉवरमधील प्राधिकरणाचे कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आधीच तैनात होता. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इमारतीच्या आत प्रवेश नाकारला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इमारतीच्या समोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत उड्डाणपुलाची दुर्घटना भ्रष्टाचारामुळे घडल्याचा आरोप सुरू केला.
अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी राजीव अग्रवाल इमारतीच्या खाली आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समोर या दुर्घटने संदर्भातली माहिती मांडण्याचे प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामाचा परिणाम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केला...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कालची दुर्घटना बेयरिंग फेलवर या कारणामुळे घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत असल्याची माहिती दिली आहे. उड्डाणपुलाच्या पिलर क्रमांक सात आणि आठ दरम्यान ज्या बेअरिंगवर खाली कोसळलेला पिलर बसवण्यात आलं होतं. त्यापैकी काही बेरिंग फेल झाल्यामुळे तो पिलर खाली कोसळला असावा अशी शक्यता प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी राजू अग्रवाल यांनी व्यक्त केली.
460 कोटी रुपयांमध्ये वर्ष 2022 पर्यंत पूर्ण केल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचा आतापर्यंत 68 टक्के बांधकाम पूर्ण झाला असून 275 कोटी रुपयांचा पेमेंट ही कंत्राटदाराला केल्याची माहिती त्यांनी दिली. उड्डाणपुलाचा बांधकाम जीडीसीएल आणि एसएमएस या दोन खाजगी कंपन्यांकडून संयुक्तरित्या केला जात असून कालचा दुर्घटनेत त्यांच्या कामासंदर्भात काही उणिवा निघून आल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासनही अग्रवाल यांनी दिले.
दरम्यान, ज्या पूर्व नागपूर परिसरात उड्डाणपुलाला संदर्भातली ही दुर्घटना घडली आहे. तो भाग आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच भागातून भाजपने गेल्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते. मात्र गेले सात वर्ष पारडी परिसरात ज्या पद्धतीने उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेचा काम प्रलंबित आहे, अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ते पाहता कालची दुर्घटना भाजपसाठी या परिसरात डोकेदुखीचा कारण ठरण्याची शक्यता आहे. राजकीय विरोधक हे हीच संधी ओळखून कालच्या दुर्घटनेचा राजकीय भांडवल करण्यासाठी तत्पर झाले आहे.