(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही
नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला आहे. सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचा निर्माण कार्य बंद होतं.
नागपूर : नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला आहे. सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचा निर्माण कार्य बंद होतं. सोबतच खालून जाणार्या रस्त्यावर जास्त वाहतूकही नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
नागपूरच्या पारडी परिसरातील एच बी टाऊन चौका वरून कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याच उड्डाणपुलाच्या दोन पिल्लर दरम्यान सुमारे 50 ते 60 फूट लांबीचा एक सेगमेंट मधून तुटल्यामुळे खाली कोसळला. जेव्हा ही दुर्घटना घडली त्या वेळेस खालून वाहतूक नव्हती, सोबतच निर्माण कार्य सुरू नव्हतं, त्यामुळे सुदैवाने दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
घटनास्थळाच्या एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या संख्येने भाज्यांचे आणि फळांचे ट्रक्स या भागातून जातात. मात्र साडेनऊ वाजता सुदैवानं एकाही वाहनाची वाहतूक तिथून सुरू झाली नव्हती. त्यामुळे जीवित हानी टळली. विशेष म्हणजे उड्डाणपुलाचा सेगमेंट या ठिकाणी रस्त्यावर खाली कोसळला आहे त्या ठिकाणी त्यामुळे काँक्रीट रोडवरही मोठा खड्डा पडला आहे.
दुर्घटनेनंतर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी पोहोचले. दुर्घटनेची तांत्रिक दृष्टिकोनातून तज्ञांकडून चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करू अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात आले.