Nitin Gadkari: नितीन गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरून शाकीरनं धमकी दिल्याचं तपासात उघड
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीच्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. अकबर पाशा हा प्रतिबंधित पीएफआयचा सदस्य आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरनं गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. जयेश पुजारी उर्फ शाकीरच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीच्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. अकबर पाशा हा प्रतिबंधित पीएफआयचा सदस्य आहे. त्यामुळे नागपूर पोलीस बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अखबर पाशा सह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार आहे. त्यासाठी नागपूर पोलीस परत एकदा बेळगावला जाणार आहे.
बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोन वेळेला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
जयेश उर्फ शाकीर सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागे दोरे देशाच्या सीमेपलीकडे ही जात आहे आणि त्या सर्व अनुषंगाने नागपूर पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास करत असल्याचे ते म्हणाले.
14 जानेवारी आणि 21 मार्चला केले होते धमकीचे कॉल
दरम्यान, बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने दिली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या :