Nana Patole | 2017 मध्ये भाजपला रामराम, 2021 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष; नाना पटोले यांची राजकीय वाटचाल
नाना पटोले हे नाव मूळात राष्ट्रीय पटलावर झळकले ते चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये. कारण होतं भाजपात राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सार्वजनिक मंचावरुन सुरु केलेला विरोध.नानांनी 2017 भाजपला राजीनामा करत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. 2021 मध्ये त्यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. जाणून घेऊया नाना पटोले यांची राजकीय वाटचाल
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्ष आणि दहा उपाध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आली आहे. जाणून घेऊया नाना पटोले यांचा राजकीय प्रवास
नाना पटोले हे नाव मूळात राष्ट्रीय पटलावर झळकले ते चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये. कारण होतं भाजपात राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सार्वजनिक मंचावरुन सुरु केलेला विरोध. भंडाऱ्याच्या साकोली इथे राहणारे नाना पटोले हे गेल्या चार वर्षात चर्चेतही राहिले आणि त्याचबरोबर त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेखही चढता राहिला.2014 मध्ये भाजपचे देशभरातून निवडून आलेल्या खासदारांपैकी ते एक होते. मात्र साकोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नाना यांना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची तऱ्हा आवडली नाही. मोदी कोणाचे ऐकत नाहीत, भाजपमध्ये राहून असं उघडपणे म्हणणारी पहिली व्यक्ती म्हणजे नाना पटोले. आपल्या उघड विरोधामुळे नानांनी लक्ष वेधून घेतलं होतं.
नानांच्या या विरोधामुळे एकीकडे भाजपची एकंदरीत पूर्ण फळीच जरी हादरली असली, तरी दुसरीकडे शेतकरी आंदोलन, यशवंत सिन्हा यांच्यासारखे भाजपचे बंडखोर नेते आणि विरोधी काँग्रेस पक्षाला मात्र नाना हवेहवेसे झाले. अपेक्षित ते घडले. नानांनी मोदी, शेतकाऱ्यांची कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या असे मुद्दे घेत 2017 ला राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये पुढे प्रवेशही घेतला.
नानांची पक्ष सोडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. बघूया नाना पटोले याची राजकीय वाटचाल.
1991 - अपक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणूक जिंकले 1994 - लाखांदूरमधून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली, हरले 1999 - लाखांदूर विधानसभेतून काँग्रेसच्या तिकीटावर जिंकून आले 2004 - लाखांदूर विधानसभेतून पुन्हा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले 2008 - शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचा राजीनामा 2009 - अपक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांविरोधात लोकसभा निवडणूक लढवली 2009 - भाजपमध्ये प्रवेश 2009 - भाजपकडून साकोली विधानसभा जिंकली 2014 - भाजपकडून यावेळी प्रफुल्ल पटेल यांना लोकसभेत हरवले 2017 - भाजपला रामराम 2018 - काँग्रेसमध्ये घरवापसी 2019 - नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर लोकसभेच्या मैदानात, पराभूत 2019 - साकोली विधानसभा काँग्रेसकडून जिंकले आणि विधानसभा अध्यक्षही झाले 2021 - विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
नाना पटोले यांचे एकूणच व्यक्तिमत्व बघता ते काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने प्रदेश अध्यक्ष म्हणूनच जास्त फायदेशीर ठरु शकतात. पक्ष वाढवण्यासाठी नानांची आक्रमकता, त्यांची शेतकरी विषयाशी असलेली नाळ आणि ओबीसी नेतृत्व म्हणून मान्यता हे सर्व महत्वाचे आहे. कुठेतरी विधानसभा अध्यक्षपदामुळे येणारी बंधने ही एकंदरीत त्यांच्या स्वतःच्या ही व्यक्तिमत्वाला बांधणारी होती. शिवाय नाना पटोले यांनाही विधानसभा अध्यक्षापेक्षा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा होती.
येत्या काळात राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून होतील असं चित्र असताना त्यांच्याशी चांगले ट्युनिंग असणारे नाना पटोले हे महाराष्ट्रासारख्य महत्वाच्या राज्याचे अध्यक्ष असणे हे काँग्रेसच्या फायद्याचे आहे.