(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News: नागपूरजवळ तीन हजार वर्षापूर्वीच्या वसाहतींचे पुरावे, डॉ. मनोहर नरांजेंनी लावला शोध
Nagpur News: शिला वर्तुळे त्या काळातील माणसांची कबरी असून तिथे पुरातत्त्व विभागाने उत्खनन केल्यास त्या काळातील समृद्ध सांस्कृतिक वारसा समोर येऊ शकतो, असा ही डॉ. नरांजे यांचा दावा आहे.
Nagpur News : नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील कोहळा गावाजवळ अडीच हजार ते तीन हजार वर्षे जुन्या मानवी वसाहतीचे सबळ पुरावे आढळले आहेत. कोहळा गावाजवळच्या जंगलात सुमारे शंभर एकर परिसरात शंभरहून अधिक शिला वर्तुळे म्हणजेच, Stone Circle आढळली आहेत. विशेष म्हणजे, ही शिला वर्तुळे पुरातत्व शास्त्रात प्रचंड आवड असलेल्या डॉ. मनोहर नरांजे या शिक्षकाने शोधून काढली आहेत.
पूर्व विदर्भात ही शेती करणारी पहिली मानवी वसाहत असावी असा डॉ. नरांजे यांचा दावा आहे. ही सर्व शिला वर्तुळे त्या काळातील माणसांची कबरी असून तिथे पुरातत्त्व विभागाने उत्खनन केल्यास त्या काळातील समृद्ध सांस्कृतिक वारसा समोर येऊ शकतो असा ही डॉ. नरांजे यांचा दावा आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी जंगलात फक्त शिलावर्तुळेच नाही तर कोहळा गावाच्या दुसऱ्या बाजूला शेत शिवारामध्ये त्या काळातील आणि त्यानंतरच्या सातवाहन आणि वाकाटक काळातील अनेक अवशेषही सापडले आहे. त्यामध्ये मातीच्या विटा, पाटा वरवंट्याचे तुकडे, शिव आणि नंदी तसेच काही मूर्तींचे भग्न तुकडे आढळल्याने या संपूर्ण परिसरात अडीच हजार वर्षांपूर्वी फक्त मानवी अस्तित्वच नव्हते... तर ते लोकं समृद्ध शेती तसेच खनिजांचे उत्खनन ही करत होते. ही वसाहत लौह युगाची असल्याने या वसाहतीतील माणसे लोखंडी अवजारांचा वापरही करत असल्याचा डॉ. नरांजे यांचा म्हणणे आहे.
डॉ. नरांजे आणि स्थानिक गावकऱ्यांसह एबीपी माझाने ही कोहळा गावाच्या जवळ असलेल्या पिपरडोल टेकड्यांच्या जंगलात जाऊन ही शिला वर्तुळे कशी आहेत, त्यांचे काय ऐतिहासिक महत्व आहेत हे जाणून घेतले.
शिला वर्तुळाचा सविस्तर अभ्यास केल्यावर डॉ. नरांजे यांनी केलेला दावा
- कोहळा गाव जवळची ही मानवी वसाहत विदर्भातील पहिली शेती करणाऱ्यांची वसाहत होती.
- कोहळा जवळच्या शिलावर्तुळांच्या निर्मितीसाठी परिसरात उपलब्ध असलेला काळा पाषाण वापरला आहे.
- काही शिलावर्तुळे आकाराने लहान तर काही विशाल आहे.
- येथील शिलावर्तुळाचा व्यास सुमारे पाच मीटर ते पंधरा मीटर असा आहे.
- वर्तुळाकार शिळांच्या मध्ये दगड गोट्यांचा भराव बहुतेक सर्वच शिलावर्तुळांमध्ये आढळून येतो
- तथापि काही वर्तुळांमध्ये तो बाह्य कारणांमुळे नष्ट झालेला आहे.
- शिला वर्तुळांसाठी वापरलेली जागा ही कृषी कार्यासाठी उपयुक्त नसून ती डोंगराळ व जंगलालगत आहे.
- कृषी योग्य भूमी दफन स्थानासाठी वापरली जाऊ नये असा विचार यामागे असणे संभाव्य आहे.
- या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती.
- विदर्भातील खास करून उमरेड आणि आजूबाजूच्या परिसरातील खनिज संपत्तीचे ज्ञान अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच तिथे वसाहत करून राहत असलेल्या मानवाला माहित होते.
- कोहळा गावाजवळचे शिला वर्तुळ त्या काळातील दफन भूमी असून त्याचे शास्त्रोक्त उत्खनन केल्यावर अनेक अवजारे ,मातीची भांडी व मृत व्यक्तीशी संबंधित इतर वस्तू असण्याची शक्यता आहे..
- कोहळा परिसरातील शिळावर्तुळांची विपुल संख्या लक्षात घेता येथे बऱ्याच मोठ्या संख्येत महापाषायुगीन लोक दीर्घकाळ वास्तव्यास होते असा अंदाज आहे.