Nagpur Accident: गाडी मालक म्हणून संकेतवर गुन्हा दाखल होणार की नाही? अपघातापूर्वी बीफ खाल्लं की नाही? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
Nagpur Accident:पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? संकेतची मेडिकल टेस्ट का केली नाही?, गाडी मालक म्हणून संकेतवर गुन्हा का दाखल होत नाही? गाडीवर नंबर प्लेट का नाही? अपघात घडवणाऱ्या तरुणांनी बीफ खाल्ला होता का? या प्रश्नांवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नागपूर: नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी राज्यातील राजकारण तापत असल्याचं चित्र आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नागपुरातील सीताबर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. त्यांनी या घटनेच्या संदर्भात पोलिसांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांसमोर अनेक सवाल उपस्थित केले, त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? संकेतची मेडिकल टेस्ट का केली नाही?, गाडी मालक म्हणून संकेत बावनकुळे वर गुन्हा का दाखल होत नाही? गाडीवर नंबर प्लेट का नाही? अपघात घडवणाऱ्या तरुणांनी बीफ खाल्ला होता का? या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिलं आहे. सहाय्यक पोलीस उपायुक्त (डीसीपी) राहुल मदने यांनी संबधित प्रश्नांवर उत्तर दिली आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे निघून गेल्यानंतर डीसीपी राहुल मदने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Nagpur Hit And Run)
पोलिसांवर राजकीय दबाव आहे का?
याबाबत बोलताना आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही आणि आम्ही त्याला बळी पडण्याचा कुठलाही कारण नाही. जी काही कायदेशीर प्रोसिजर आहे, आम्ही त्या पद्धतीने समोर जात आहोत. ऑडी कार अर्जुन हावरे चालवत होता, त्याच्या शेजारी संकेत बसला होता, तर पाठीमागच्या सीटवर रोनित बसला होता. ऑडी कारचा आरटीओकडून इन्स्पेक्शन झाला आहे. मेडिकल अहवाल ही आम्हाला मिळाला आहे. जो काही तपास सुरू आहे तो नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे कोणालाही वाचवण्याचा किंवा, कोणाचा दबाव असण्याचं काहीत कारण नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. (Nagpur Hit And Run)
संकेतची मेडिकल टेस्ट का केली नाही?
संकेत त्या गाडीत होता हे जवळपास 12 ते 15 तासानंतर समोर आले. त्यामुळे तेव्हा त्याचा मेडिकल टेस्ट करण्यामध्ये काहीही अर्थ नव्हता. त्यामुळे संकेत बावनकुळेची मेडिकल टेस्ट केली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. (Nagpur Hit And Run)
गाडी मालक म्हणून संकेत बावनकुळे वर गुन्हा दाखल होणार की नाही?
जर गाडीच्या मालकाने एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला गाडी चालवायला दिली, लायसेन्स नसलेल्या व्यक्तीला गाडी चालवायला दिली आहे, असं आढळल्यास गाडी मालकावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात असं काहीही झालेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गाडीवर नंबर प्लेट का नव्हती?
गाडीवर नंबर प्लेट का नव्हती? यावर बोलताना पोलिसांनी सांगितलं की, कोराडीमधून आम्ही गाडी ताब्यात घेतली. तेव्हा गाडीवर नंबर प्लेट लागलेली होती. पोलीस स्टेशनमध्ये गाडी आणली तेव्हाही नंबर प्लेट लागलेली होती. मात्र, नंबर प्लेट अपघातामुळे लूज झालेली होती. ती पडू नये, गहाळ होऊ नये, म्हणून नंबर प्लेट काढून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली आहे. नंबर प्लेट आम्ही जप्त केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
तरुणांनी बीफ खाल्ला होता का?
अपघात घडवणाऱ्या तरुणांनी बीफ खाल्ला होता की नाही या प्रश्नावर पोलिसांनी माहिती देताना सांगितलं, असं काहीही नाही, असं बिलामध्ये नमूद ही नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
अपघातावेळी गाडी चालवणाऱ्याचे वडील काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचं समोर
ऑडी कारचा अपघात होऊन दोन इतर कार आणि दुचाकीला धडक बसली, त्या ऑडी कारला अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. तसेच त्यांनी एकदा महानगरपालिका निवडणूक नागपूरच्या खामला परिसरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. अशी माहिती एबीपी माझ्याच्या हाती लागली आहे. मात्र, काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जितेंद्र हावरे हे गेले काही वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणात तेवढे सक्रिय नाहीत, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातात आता काँग्रेस कनेक्शन उघड झाले असून या अपघातातील सर्वपक्षीय मैत्री असल्याचेही पुढे आले आहे.