Nagpur Crime : मित्राच्या मदतीने पत्नीची स्वत:च्याच घरी चोरी, मित्र पसार, पत्नीला बेड्या; नागपुरातील धक्कादायक घटना
Nagpur Crime : पत्नीने मित्राच्या मदतीने पतीच्या म्हणजेच स्वत:च्या घरी चोरी घडवून आणली. ही चोरीची घटना नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम भागातील आहे.
![Nagpur Crime : मित्राच्या मदतीने पत्नीची स्वत:च्याच घरी चोरी, मित्र पसार, पत्नीला बेड्या; नागपुरातील धक्कादायक घटना Nagpur Crime woman committed the theft at her own house with the help of a friend shocking incident Nagpur Nagpur Crime : मित्राच्या मदतीने पत्नीची स्वत:च्याच घरी चोरी, मित्र पसार, पत्नीला बेड्या; नागपुरातील धक्कादायक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/01/6d3139febdbcb2eb202b208927d258a2169087035550183_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur Crime : आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील मात्र पत्नीने मित्राच्या मदतीने पतीच्या म्हणजेच स्वत:च्या घरी चोरी घडवून आणली असं फारच क्वचित ऐकलं असेल. बरं ही चोरी थोडीथोडकी नाही तर तब्बल 13 लाख 60 हजार रुपयांची आहे. ज्यात 6 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 7 लाख 60 हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. ही चोरीची घटना नागपूरच्या (Nagpur) सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम भागातील आहे.
मित्राच्या मदतीने घरात चोरी करण्याचा प्लॅन
नागपुरातील या पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरु होता. परंतु काही दिवसांपूर्वी पतीचा अपघात झाला. त्यादरम्यानच पत्नीचा जुना मित्र तिच्या संपर्कात आला. तिने या मित्राच्या सोबतीने आपल्याच घरात चोरी करण्याचा प्लॅन आखला. आरोपी पत्नी शिवानी यादव हिने आपल्या मित्राला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून घरात कुठे पैसे आहे याची आधी माहिती दिली. नंतर ठरलेल्या दिवशी पतीला नातेवाईकाकडे जेवायला घेऊन मित्रांना आपल्याच घरी चोरी करायला बोलावले. प्लॅननुसार चोराला म्हणजे मित्राला घरात कुठे काय ठेवलं आहे त्याची सगळी माहिती दिली होती. प्लॅननुसार हे दोघे बाहेर जाताच तो घरात शिरला. काही वेळात ठरल्याप्रमाणे त्याने सगळा मुद्देमाल लंपास केला. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचं पतीच्या निदर्शनास आलं. मात्र पतीला पत्नीच्या कारनाम्याची कोणीतीही कल्पना नसल्याने त्याने सदर पोलिसात चोरीची तक्रार दिली.
पत्नी अटकेत पण मित्र रोकड घेऊन पसार
पोलिसांना सुरुवातीपासूनच तक्रारदाराच्या पत्नीवर संशय होता. पोलिसांनी घटनेचा बारीक तपास केला. तेव्हा पुढे आलं की, घटनेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला बाहेर घेऊन गेली होती असं समजलं. शिवाय त्या दिवसाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करणारा मित्र छत्री घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. रामटेक तालुक्यातील त्याच्या घरी पोलीस पोहोचले. त्याच्या घराची झडती घेतली असता सोन्या चांदीचे दागिने सापडले. मात्र रोकड घेऊन तो पसार झाला होता. पोलिसांच्या तपासात चोरीमध्ये घरातील व्यक्तीचाच सहभाग असल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पत्नी शिवानी यादव हिची चौकशी केली असता तिने आपणच मित्रांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केलं. सध्या शिवानी यादव हिची कारागृहात रवानगी झाली असून घटनेत सहभागी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)