(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : प्रॉपर्टी कमिशनच्या वादातून मित्राने काढला मित्राचा काटा, नागपुरातील घटना
Nagpur: गेल्या काही महिन्यांपासून परवेज शेखला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. त्यामुळे दोघांमध्येही वाद होता
Nagpur Crime : प्रापर्टी विकल्यावर त्याचे कमिशन देण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहेत. धारदार शस्त्राने चढविलेल्या हल्ल्यात तरुणाचा जागीच बळी गेला आहे. ही घटना मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रसेन मार्गावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Nagpur Police) पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.
परवेज वल्द याकूब खान (वय 28, रा. पारडी) असे आरोपीचे तर परवेज शेख वल्द पापा मिया शेख (वय 30, रा. रोशनबाग रजा जमा मस्जिद, खरबी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परवेज खान आणि परवेज शेख हे मिळून प्रापर्टीचा व्यवसाय करायचे. त्यांनी मिळून एक प्रापर्टी विकली होती. त्याच्या कमिशनचे पैसे परवेज खान याच्याकडे होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो परवेज शेखला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. त्यातून दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता. दरम्यान काल परवेज खान याने परवेज शेख याला फोन केला. याशिवाय अग्रसेन चौकात ये तुला तुझे पैसे देतो सांगून बोलावून घेतले.
यावेळी परवेज शेख आपला मित्र कलीम शेख वल्द करीम शेख (वय 36, रा. खरबी) याच्यासह बाईकवर आला. दोघेही येताच, परवेज खान याने तुला पैसे हवे होते ना? अशी विचारणा करत, वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी परवेज खान याच्यासोबत असलेल्या चार साथीदारांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच परवेजने चाकू काढून परवेज शेख याचा मानेवर, पोटावर, पाठीवर सपासप वार केले. त्यातून परवेज शेख रक्ताच्या थारोळ्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हे बघून कलीम शेख याने पळ काढला. त्याला मारण्यासाठी पाचही जण मागे धावले. मात्र, त्याने कसेबसे तहसील पोलिस ठाणे गाठले. आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, परवेजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला. अद्याप आरोपी फरार आहेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत, शोध सुरू केला आहे.
दोघेही अट्टल गुन्हेगार
परवेज खान आणि परवेज शेख हे दोघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर लुटमार आणि धमकाविण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यातूनच ते प्रापर्टीच्या व्यवसायात शिरले. वादातील प्रापर्टी प्रकरण हाताळण्यासाठी पैसे घ्यायचे अशी माहिती आहे. यापैकीच एका प्रापर्टीमध्ये त्यांनी पैसे कमावले होते. मात्र, त्यातील हिस्स्यावरुन हा वाद झाला होता.
ही बातमी देखील वाचा...