(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime News : गांजाच्या व्यसनासाठी तब्बल साडेतीन लाखांच्या एसीची चोरी; दीड वर्षानंतर घटना उघडकीस, संशयित जेरबंद
Nagpur News: एका ज्यूस विक्रेत्याने गांजाचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्क निर्वाधिन असलेल्या इमारतीतून साडेतीन लाख रुपयांचे एसी चोरले आहे. विशेष बाब म्हणजे या चोरीचा उलगडा तब्बल दीड वर्षानंतर झाला आहे.
Nagpur Crime News नागपूर : एका ज्यूस विक्रेत्याने गांजाचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्क निर्वाधिन असलेल्या सरकारी इमारतीतून साडेतीन लाख रुपयांचे एसी चोरल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. विशेष बाब म्हणजे या चोरीचा उलगडा तब्बल दीड वर्षानंतर झाला आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यातील पथकाने संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून सहा एसी आणि सहा कॉम्प्रेसर हस्तगत करण्यात आले आहेत.
नागपुरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे विविध शासकीय कार्यालये स्थलांतरित होणार होती. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसविण्यात आली. लाखो रुपयांची उपकरणे बसवूनही त्यांच्या संरक्षणासाठी कुठलीही पावले उचलली जात नाही, तसेच रात्रीच्या वेळी या परिसरात कोणी फिरकत देखील नाही. या संधीचा फायदा घेत परिसरातील ज्यूस विक्रेता राजराखन उर्फ पटवारी छोटेलाल पटेल याने चोरी करण्याचा निर्णय घेतला.
6 एसी-6 कॉम्प्रेसरची चोरी
या प्रकरणातील संशयित आरोपी राजराखन हा मूळचा मध्य प्रदेशातील रारेवा येथील रहिवासी आहे. तो झिंगाबाई टाकळीतील मायानगर येथे राहतो. त्याचा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर ज्यूसचा स्टॉल होता. त्याला गांजाचे व्यसन असल्याने शॉर्टकटने पैसे कमवण्यासाठी तो तयारी करत होता. त्याला सदर येथील बांधकामाधीन इमारतीची माहिती मिळाली. त्याने या इमारतीची जाऊन पाहणी केली असता त्याला मोठ्या प्रमाणात एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आढळून आले.
राजराखनने तेथून एसी आणि त्याचे कॉम्प्रेसर चोरण्यास सुरूवात केली. तो एसी, कॉम्प्रेसरसह इतर वस्तू रात्रीच्या वेळी हातगाडीवर लपवून घरी घेऊन जात असे. राजराखनने 18 सप्टेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2022 दरम्यान नियोजन भवनातून 3.63 लाख रुपयांचे एसी आणि कॉम्प्रेसर चोरले. ज्यूसचा स्टॉल बंद झाल्यावर तो रात्री चोरी करायचा.
दीड वर्षानंतर झाला चोरीचा उलगडा
16 सप्टेंबर 2022 रोजी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजराखनने घरामध्ये एसी आणि कॉम्प्रेसर लपवून ठेवले होते. तो काही दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होता. त्याच्याकडे ब्रँडेड कंपनीचा एसी असल्याने लोकांना संशय आला. त्यांनी सदर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी राजराखन याच्या घरावर छापा टाकला. तेथे एसी आणि कॉम्प्रेसर सापडले. त्याची कसून चौकशी केली असता राजराखन याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या