(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur: मुलीला पाच ते सहा दिवस घरात कोंडून कुटुंबीय बाहेरगावी; शेजाऱ्यांनी खिडकीच्या ग्रीलमधून काढलं बाहेर
Nagpur Crime: घरात कोंडून ठेवण्यात आलेल्या मुलीला घरकामासाठी नागपुरात आणल्याचा संशय आहे.
नागपूर: नागपुरातील (Nagpur) एका घरात 8 ते 10 वर्षीय मुलीला घरात कोंडून कुटुंबीय बाहेरगावी गेले होते, जवळपास 5 ते 6 दिवसांनंतर शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली आणि घरात कोंडून ठेवण्यात आलेल्या या मुलीची शेजाऱ्यांच्या मदतीने सुटका करण्यात आली. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील बेसा-पिपळा रोडवरील 'अथर्व नगरी' या उच्चभ्रू वस्तीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुलीला घरकामासाठी विकत आणल्याचा संशय
नागपुरातील हे कुटुंबीय गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुलीला घरात एकटं कोंडून बाहेरगावी गेले होते. खिडकीच्या ग्रीलमधून शेजाऱ्यांनी मुलीला बाहेर काढलं. ग्रीलमधून मुलगी बाहेर पडल्यावर शेजाऱ्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीला विकत घेऊन घरकामासाठी नागपुरात आणल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.
मुलीच्या शरीरावर सिगारेटने चटके दिल्याचे डाग
मुलीला खिडकीतून बाहेर काढल्यानंतर शेजाऱ्यांनी तिची विचारपूस केली आणि मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पीडित मुलीच्या शरीरावर सिगारेटने चटके दिल्याचे डाग असल्याचं देखील बोललं जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये देखील वाढ
नागपुरात हत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. उपराजधानी नागपुरात 20 ऑगस्टला 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली असून जीवघेण्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले, त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हत्येची पहिली घटना
जरीपटका पोलीस स्टेशनअंतर्गत नारा परिसरात रात्री उशिरा हत्येची पहिली घटना घडली. महेश कुमार उईके या तीस वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शेजारीच राहणाऱ्या राजकुमारी उईके आणि करण नावाच्या मजुरांनी मिळून मजुराची हत्या केली. महेश हा मजूर शेजारी राहणाऱ्या राजकुमारीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्याच रागातून राजकुमारीने आपल्या पुरुष मित्र करणच्या मदतीने महेशवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलं. रविवारी (20 ऑगस्ट) रुग्णालयात उपचारादरम्यान महेश उईके याचा मृत्यू झाला.
हत्येची दुसरी घटना
यशोधरा नगर पोलीस स्टेशनअंतर्गत कांजी हाऊस चौकात रविवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजता हत्येची दुसरी घटना घडली. बादल पडोळे या पंचवीस वर्षीय कुख्यात गुन्हेगाराला परिसरातीलच चेतन सूर्यवंशी नावाच्या दुसऱ्या गुन्हेगाराने धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारलं. गुन्हेगारी जगतातील जुन्या वैमनस्यातून बादलची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
हत्येची तिसरी घटना
हत्येची तिसरी घटना काटोल नाक्याजवळ उघडकीस आली. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला ट्रक चालक मेहबूब खान याचा मृतदेह रविवारी काटोल नाक्याजवळील एका नाल्यात आढळून आला, त्यांची हत्या सोबतच्या ट्रक चालकांनी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
हत्येच्या प्रयत्नाची चौथी घटना
हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत खरसोली गावात लहान मुलाच्या नामकरण सोहळ्यात नाचण्याच्या मुद्द्यातून झालेल्या वादातून सुखदेव उईके (55 वर्ष) आणि रेखा उईके (50 वर्ष) या दाम्पत्यावर त्याच परिसरात राहणाऱ्या दिनेश पाटील नावाच्या व्यक्तीने चाकूने हल्ला केला आणि दोघांना गंभीर जखमी केलं.
हेही वाचा:
Nagpur Crime: नागपुरात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक