Nagpur News : नागपुरात भाजपची कार्यकर्त्यांसोबत 'टिफिन डिप्लोमसी'; पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती
Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी भाजपने बुथ स्थरावरच्या कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठकीचे नियोजन केले आहे.
BJP Nagpur : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी भाजपने (BJP) बुथ स्थरावरच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यभरात टिफिन बैठक करावी, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपुरातील (Nagpur) कोराडीतल्या बुथ कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठकीचे आयोजन केले. कोराडी येथील यशवंत लॉनवर पक्षातील सुपर वॉरियर आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत वैचारिक चर्चा व्हावी, तसेच आगामी निवडणुकांची अंतिम टप्प्यातली रणनिती सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने भाजपमधील उच्चपदस्थ नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत या टिफिन बैठकीचे नियोजन केले आहे. एकप्रकारे भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसोबत राज्यभरात 'टिफिन डिप्लोमसी' चे आयोजन केले असून याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल, असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलतांना व्यक्त केला.
राज्यभरात भाजपची 'टिफिन डिप्लोमसी'
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही फार जुनी पद्धत असून आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत प्रत्यक्षपणे संवाद साधता यावा, यासाठी ही बैठक आहे. आमच्या पक्षाचा डोलारा ज्या वैचारिक कार्यपद्धतीवर उभा झाला आहे, त्याचाच हा एक भाग आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता आमच्या पक्षाचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे बावनकुळे म्हणाले
पक्षातील उच्चपदस्थ नेता जेव्हा प्रत्यक्ष आमच्यासोबत येऊन मांडीला मांडी लावून आपुलकीने आमची विचारणा करतो, सोबत जेवण करतो, त्यावेळी एक कार्यकर्ता म्हणून त्याचे मनोबल निश्चित वाढल्या शिवाय राहत नाही. सोबतच पक्ष एक परिवार म्हणून ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. अशा छोटेखानी टिफिन बैठकीच्या माध्यमातून अनेक विचारांची अदान-प्रदान होत असते. सोबतच पक्षाच्या बळकटीसाठी अशा उपक्रमाचे मोठे हातभार लाभत असल्याचे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले.
असे घातपात कुणी करत नाही
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, कुठल्याही पक्षाचा किंवा अगदी विरोधी पक्षातला जरी कोणी छोट्यात-छोटा कार्यकर्ता असला तरी कुणीही कुणाचा अपघात व्हावा, असा विचार करू शकत नाही. सरते शेवटी कुठल्याही अपघातात व्यक्तिगत त्या व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे त्यात नुकसान होत असतं. राजकारणात विरोधी पक्षातीलं जरी कोणी असलं तरी त्यांची व्यक्तिगत जीवनातली काळजी घेणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि हे संस्कार प्रत्येकाने कायम ठेवले पाहिजे. त्यामुळे असे घातपात कुणी करत नाही. तसेच अशा गोष्टीत कोणीही राजकारण करू नये. असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना दिला आहे
इतर महत्वाच्या बातम्या