अखेर मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल, यंदा 5 दिवस विलंब, हवामान खात्याची माहिती
मान्सून नागपुरात दाखल (Monsoon Entered in Nagpur) झाला आहे. हवामान खात्याकडून (IMD) नागपूरसह मान्सून पूर्व विदर्भात (Monsoon in East Vidarbha) दाखल झाल्याची घोषणा केली आहे.
Monsoon Entered in Nagpur : अखेर मान्सून नागपुरात दाखल (Monsoon Entered in Nagpur) झाला आहे. हवामान खात्याकडून (IMD) नागपूरसह मान्सून पूर्व विदर्भात (Monsoon in East Vidarbha) दाखल झाल्याची घोषणा केली आहे. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही 16 जून होती. मात्र, 5 दिवसांच्या विलंबाने मान्सून दाखल झाला आहे. केरळनंतर मान्सून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात यापूर्वीच दाखल झाला होता. आता विदर्भातही मान्सून दाखल झाला आहे.
पावसाअभावी शेतातील पेरण्याही खोळंबल्या
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल झाला आहे. यापूर्वी मान्सून राज्याच्या विविध भागात दाखल झाला होता. मात्र, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मान्सून पोहोचला नव्हता. अखेर आज मान्सूनचे त्या ठिकाणी आगमन झालं आहे. मान्सूनअभावी वातावरणात उकाडा जाणवत होता. शेतातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगांनी जोर पकडला आहे.
मुसळधार पावसाने नागरिकांना दिलासा
दरम्यान, शुक्रवारी (21 जून) संध्याकाळी तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुढील तीन ते चार दिवस नागपुरात चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळं शेतीच्या कामांना वेग येणार आहे. कारण, पावसाअभावी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.
राज्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्य
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या उपग्रह प्रतिमांनुसार, जळगाव, बुलढाणा, बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत. नागपूरच्या आसपास हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी पेरणीला सुरुवात
ज्या भागात चांगला पाऊस झाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
राज्यात कधी पडणार मोठा पाऊस? पंजाबराव डखांनी सांगितली तारीख, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा