दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरु होणार नाही : ऊर्जामंत्री
राज्यातील वीजेची मागणी कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसात विजेची मागणी 24 हजार मेगावॅटच्या पुढे गेली होती. त्यामुळे ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती.

नागपूर : राज्यात दिवाळीत बंद झालेलं भारनियमन दिवाळीनंतर पुन्हा सुरु होणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यातील वीजेची मागणी कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.
राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी असलेल्या कोळशाचं योग्य नियोजन केलं आहे. शिवाय सध्या थंडीच्या दिवसांमुळे वीजेची मागणी कमी आहे, त्यामुळे दिवाळीनंतरही भारनियमन होणार नसल्याचं बावनकुळेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
सध्या राज्यातील वीजेची मागणी कमी झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात विजेची मागणी 24 हजार मेगावॅटच्या पुढे गेली होती. ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती. वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे त्यावेळी शक्य नव्हते, म्हणून लोडशेडिंग सुरू करण्यात आली होती, असं बावनकुळे म्हणाले.
मात्र तशी परिस्थिती सध्या राज्यात नाही. विजेची मागणी कमी झाली असून ती 20 हजार मेगावॅटवर आली आहे. येत्या काळात विजेची कमतरता भासू नये यासाठी 25 हजार मेगावॅटपर्यंतचं नियोजन करण्यात आलं आहे. कोळशाचा मुबलक साठा सध्या राज्यात उपलब्ध आहे. त्याचा फायदा वीज निर्मितीसाठी होईल, असं बावनकुळेंनी सांगितलं.
राज्यातील शेतकऱ्यांची 32 हजार कोटींहून अधिकची वीज बिल थकबाकी आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी संकटात आहे. मात्र तरीही शक्य झाल्यास किमान वीज बिल भरून शेतकऱ्यांनी सरकारला मदत करावी, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
