एनसीबीने ज्यांना सोडलं त्यात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळचाही एक माणूस होता : फडणवीस
एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीने (NCP) शंका उपस्थित केली आहे. यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
नागपूर : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझवरील कारवाईत काही जणांना सोडल्याचा आरोप केला होता. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता. त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की तो क्लीन होता. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
क्रुझवरील छापेमारी बनावट, केंद्राने एका समितीची स्थापना करावी, नवाब मलिक यांची मागणी
काय म्हणाले फडणवीस?
एनसीबीने (NCB) अगोदरच सांगितले होते की त्यांनी अनेक लोकांना पकडले होते, त्याच्यातील जे क्लीन होते, त्यांना त्यांनी सोडलं आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं, ज्यांच्या फोनमध्ये काही पुरावे सापडले, संभाषण सापडले त्यांनाच फक्त ताब्यात घेतलं.
ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता. त्याचं नाव आम्ही घेत नाही. कारण की तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. एनसीबीने स्पष्ट केलंय की क्लीन होते त्यांना सोडलं आणि ते कोणत्या पक्षाचे होते हा विषय येत नाही.
नवाब मलिक यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे, त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करणार : मोहित कंबोज
नवाब मलिक यांनी काय आरोप केले?
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित कम्बोज यांचे मेहुणे आहेत. यासोबत अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आलं आहे. क्रूझवरील पार्टीतून या लोकांना अटक करण्यात आलं होतं. एनसीबी कार्यालयात देखील या तिघांना आणण्यात आलं होतं. मग त्यांना सोडण्याचे आदेश कुणी दिले. आमची मागणी आहे की, NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खुलासा करावा करावा. क्रूझवरील छापेमारीचं हे प्रकरण प्लॅन करुन केलेलं असून बोगस आहे, असा आरोपही त्यांनी केला.