Kunal Raut : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याचं प्रकरण
Nagpur News : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची रवानगी आणखी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
Kunal Raut News Update : युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतांच्या (Kunal Raut) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. युवक कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. कुणाल राऊत यांची रवानगी आणखी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
कुणाल राऊतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या पोस्टर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. कुणाल राऊत यांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. कुणाल राऊत यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत रहावं लागेल.
पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासलं काळं
आज भाजपने या दोन्ही प्रकरणांना उचलून जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. नागपूर जिल्हा परिषद म्हणजे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची दुकान झाली आहे. जिल्हा परिषद बरखास्त करा, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद समोर रस्त्यावरील वाहतूक भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरत रस्ता रोको आंदोलन केलं. नागपूरच्या जीपीओ चौक आणि उच्च न्यायालयाला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत एका बाजूची वाहतूक रोखून धरली. जिल्हा परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार केले जात असून जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून जोरदार आंदोलन
पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचं प्रकरण आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर बँक घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या सुनील केदार यांचा फोटो असल्याचा प्रकरण तापला होता. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे, म्हणून अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर काँग्रेसचे सदस्यांनी सुनील केदार यांचा फोटो छापला होता. तेव्हा एका दोषसिद्ध आरोपीचा फोटो जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर का, भाजप सदस्यांच्या या प्रश्नावर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती.
कोण आहे कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र असून त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एन.एस. यु.आय.चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :