Justice Rohit Deo : नागपूर खंडपीठातून अलाहाबादला बदली, न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टरूममध्ये राजीनामा
Justice Rohit Deo Resigns : गुरूवारी न्या. रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली कऱण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती.
Justice Rohit Deo Resigns : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांनी भर कोर्टरूममधे राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुरूवारी त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली कऱण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती. त्यावर व्यथित होऊन रोहित देव यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.
न्यायमूर्ती रोहित देव हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच नागपूर खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये आले आणि त्यांनी कोर्टरूममधल्या उपस्थितांसमोर आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेनंतर कोर्टरूममधील सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी कोर्ट रूममधल्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या वागण्यामुळं कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं म्हणून न्यायमूर्ती रोहित देव तिथून निघून गेले.
विशेष म्हणजे न्यायाधीश रोहित देव यांनी माओवादी थिंकटँक जी. एन. साईबाबाच्या प्रकरणात बहुचर्चित निर्णय देत साईबाबांची सुटका केली होती. त्याचदिवशी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि सर्वोच्च न्यायालयानं खंडपीठाचा निर्णय फिरवत साईबाबांना दोषी कायम ठेवंलं होतं. आता रोहित देव यांच्या राजीनाम्यामागे हेच कारण असल्याचीदेखील चर्चा सुरू आहे.