राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना शिवसैनिकांकडूनच हरताळ?
राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना शिवसैनिकांकडूनच हरताळ लावण्यात येतोय का?
नागपूर : राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना शिवसैनिकांकडूनच हरताळ लावण्यात येतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात शिवसेना आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात झालेल्या हल्लाबोल आंदोलनात कोरोना नियमांना हरताळा लावण्यात आला. शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते मास्कविनाच महापालिकेत दाखल झाले. सोसिअल डिस्टेंसिंगचा जोरदार फज्जा उडाल्याचंही या आंदोलनात पाहायला मिळालं. यासंदर्भात बोलताना नेते म्हणाले की, उत्साहात कोरोनाचा विसर पडतो, आम्ही नागपूरचे फुफ्फुस वाचवायला आलो आहोत." मात्र, कोरोना काळात मास्क विसरणाऱ्या शिवसैनिकांना आपल्या फुफ्फुसांचा विसर पडलाय का? हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे.
एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सर्वांनी कोरोनासंदर्भातल्या नियमांचे पालन करावे, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शिवसेनेतील काही नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना हरताळ फासत आहेत. नागपुरात शिवसेना आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. नागपूरच्या अजनी भागात उभारल्या जाणाऱ्या इंटर मॉडेल स्टेशन म्हणजेच, आयएमएस प्रकल्पासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार आहे. महापालिकेने त्यासंदर्भात 4 हजार 500 वृक्ष तोडण्यासाठी निविदा काढली असून नागपूरच्या अनेक पर्यावरण संघटन या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्याच वादात उडी घेत शिवसेनेने आज नागपूर महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढला होता.
शिवसेनेच्या हल्लाबोल मोर्चासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत आले होते. यावेळी अजनी वनाच्या रक्षणासाठी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, वृक्ष वाचवण्याच्या या आंदोलनात कोरोना नियमांचीही जोरदार पायमल्ली झाली. कोरोना काळात ऑक्सिजनची महती सांगणारे फलक घेऊन आलेले बहुतांशी शिवसैनिकांनी जगात कोरोना नाहीच, या आविर्भावात होते. त्यांनी मास्क घातले नव्हते, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचंही या आंदोलनात जोरात उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना नियम पाळण्याचे आग्रह शिवसैनिकांना लागू पडत नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उत्साहाच्या भरात कार्यकर्ते कोरोना विसरतात, असे सांगत आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी कार्यकर्त्यांची पाठराखण केली. "आम्ही नागपूरच्या विकासाच्या विरोधात नाही. मात्र अजनी वनमध्ये मोठ्या प्रमाणावर 4 ते 50 वर्ष जुने वृक्ष आहेत. जरी महापालिका सध्या फक्त 4 हजार 500 वृक्षांच्या तोडणीची निविदा काढत असली. तरी भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार असून त्यामुळे नागपूरच्या पर्यावरणाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. अजनी वन नागपूरचे फुफ्फुस असून शिवसेना नागपूरचे फुफ्फुस अशा तऱ्हेने निकामी करू देणार नाही.", असा इशारा आमदार चतुर्वेदी यांनी दिला. यावेळी शिवसेनेच्या निवडक नेत्यांनी महापालिकेत जाऊन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांना निवेदन देत वृक्षतोड न करण्याची मागणी केली. दरम्यान, निवेदन द्यायला निवडक नेते आत जातानाही शिवसैनिकांनी महापालिकेच्या इमारतीच्या आत प्रवेश करण्यासाठी पोलिसांसोबत जोरदार धक्काबुक्की केली.