बँकिंग व्यवहारांबद्दलच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्रामीणांना लुटणारी टोळी जेरबंद
ग्रामीण जनतेने बँकिंग व्यवहार करताना सावध राहावे. कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेऊन त्यांच्याकडील रक्कम त्यांच्या हातात देऊ नये. नागपूर पोलिसांनी ग्रामीण भागात भोळ्या भाबड्या बँक ग्राहकांना खराब नोट किंवा नकली नोट अशी थाप मारून लुबाडणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे.
नागपूर : ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या जनतेच्या बँकिंग व्यवहारांबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानाचा गैरफायदा घेत लुटले जात आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात ग्रामीण जनतेला लुबाडणाऱ्या अशाच एका टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही टोळी ग्रामीण भागातील नागरिकांना तुमच्या जवळील नोटांवर शाई लागली आहे, अशा नोट बँकेत स्वीकारल्या जाणार नाही. किंवा तुमच्याकडील नोटांमध्ये काही नोट नकली आहे, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होईल असे सांगून भीती दाखवायचे. संधी मिळताचं घाबरलेल्या ग्रामीण व्यक्तीच्या हातून नोटांची गड्डी घेत हातचलाखीने त्यातील काही नोटा लंपास करायचे.
या टोळीने गेल्या काही आठवड्यातच नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात आठ वेगवेगळ्या प्रकरणात अनेक ग्रामिणांना लाखो रुपयांनी लुटले आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन सदस्यांना नागपूर शहरातून अटक केली आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामीण जनता त्यांचे बँकिंग व्यवहार पार पाडण्यासाठी ग्रामीण भागातील विविध बँक शाखांमध्ये गर्दी करत आहेत. नेमकं त्याच काळात ग्रामीण जनतेला बँकिंग कायद्यांची अडचणी सांगून भोळ्या भाबड्या जनतेला लुबाडणारी एक टोळी विदर्भात सक्रिय झाली होती. या टोळीतील अनेक सदस्य ग्रामीण भागात बँकेच्या शाखेजवळ उभे राहायचे. जास्त रकमेचे व्यवहार करायला आलेल्या मात्र, बँकेच्या व्यवहाराबद्दल पूर्ण आत्मविश्वास नसलेला एखादा सावज शोधायचे.
नोटांना शाई लागली असल्याचे सांगत हातचलाखी तो ग्रामीण व्यक्ती बँकेत आपल्याकडील नोटा मोजत असताना टोळीतील एक सदस्य त्याच्याजवळ जाऊन तुमच्या जवळील नोटांवर शाई लागली आहे, असे नोट बँकेत स्वीकारले जाणार नाही. बाजारातील व्यवहारातही ते चालणार नाही, असे सांगायचे. आम्ही तुमच्याकडील शाई लागलेले नोट बदलवून देतो, अशी थाप मारायचे आणि घाबरलेल्या ग्रामीण व्यक्तीच्या हातून नोटांची गड्डी घेत हातचलाखीने त्यातील काही नोट लंपास करायचे. ही टोळी ग्रामीण जनतेच्या असली आणि नकली नोटांबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानाचाही गैरफायदा घ्यायची. तुमच्याकडे असलेल्या काही नोट नकली आहेत. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकेल असे सांगून ग्रामीण जनतेला भीती दाखवून हातचलाखीने त्यांच्याकडील काही नोटा लंपास करणे आणि ते लगेच दुसऱ्या सदस्याकडे देऊन बँक शाखेतून पोबारा करणे असे प्रकार ही टोळी करायची.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीने आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर, काटोल, रामटेक, सक्करदरा या ठिकाणी बँक ग्राहकांना फसविले आहे. तर भंडारा जिल्ह्यात सिहोरा आणि चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड या ठिकाणीही बँक ग्राहकांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात या टोळीने फसवणूक केलेला आकडा लाखो रुपयांच्या घरात आहे.
नागपूर पोलिसांना मोठं यश या प्रकारे बँक शाखेजवळ फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या टोळीवर पाळत ठेवणे सुरु केले होते. सुरुवातीला या टोळीतील मो. शेख रफिक याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोहसीन रजा गुलाम रजा आणि हैदर अली या सदस्यांना ही अटक केली आहे. विशेष म्हणजे याच टोळीने मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगसह अनेक गुन्हे केल्याची कबुली ही दिली आहे. त्यामुळे या टोळीला जेरबंद करून पोलिसांना मोठं यश मिळाला आहे. दरम्यान, ग्रामीण जनतेने बँकिंग व्यवहार करताना कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेऊन त्यांच्याकडील रक्कम त्यांच्या हातात देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Nisarga Cyclone | चक्रीवादळग्रस्तांना आणखी वाढीव मदत देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे